ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्र सोडलं आहे. महाराष्ट्रातील सरकार घटनाबाह्य सरकार असून ते काम करायचं विसरले आहेत. ते केवळ घोषणा आणि आश्वासनं देतात, मात्र अंमलबजावणी केली जात नाही. या सरकारला आता शरम उरली नाही, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिंदे सरकारवर टीकास्र सोडताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “हे सरकार अजून राजकारणातच अडकलं आहे. घटनाबाह्य सरकारने कामही करायचं असतं, हे त्यांना अजून जाणवलं नाही. राज्यात केवळ आश्वासनांवर आश्वासने आणि घोषणांवर घोषणा देणं सुरू आहेत. पण जनतेचा आवाज कुठेही ऐकला जात नाही. त्यामुळे या सरकारला ‘घोषणा सरकार’, ‘खोके सरकार’ अशी अनेक नावं मिळाली आहेत. आपण काम करणं गरजेचं आहे, हेही ते विसरून गेले आहेत.”

“राज्यातील प्रत्येक महामंडळाच्या बस स्थानकावर शिंदे सरकारचे होर्डिंग्स लागले आहेत. या होर्डिंगसाठी पैसे दिले आहेत की नाही? हे अजूनही माहीत नाही. दिले असतील तर कुणी दिले? आणि दिले नसतील तर याची नुकसानभरपाई कोण करणार? हेही माहीत नाही. शहरात अनेक ठिकाणी बेकायदेशीर बॅनर लावले आहेत. पण महापालिकेकडून कुठेही कारवाई केली जात नाही. एवढे सगळे राजकीय होर्डिंग्स बघून मला मळमळायला लागलं आहे” अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा- “…तेव्हा तुम्ही काय करत होता?” राधाकृष्ण विखे पाटलांचा शरद पवारांना टोला!

खरं तर, सणासुदीपासून राजकारण बाजुला ठेवलं पाहिजे. पण सर्वत्र उधळपट्टी सुरू आहे. त्यांनी महागाईवर, रुपयाच्या पडत्या किमतीवर, शेतकऱ्यांच्या नुकसानीवर, बेरोजगारीवर बोलायला हवं. पण प्रश्नांवर कुणीही बोलायला तयार नाही. केवळ उधळपट्टी सुरू आहे. निव्वळ घोषणा दिल्या जात आहेत. दहिहंडीच्या काळातही एवढ्या घोषणा दिल्या, मात्र त्यातील एकही घोषणा अंमलात आणली नाही. फक्त खोटं बोलत राहायचं, हेच सरकारचं धोरण आहे, अशी खोचक टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aaditya thackeray on eknath shinde devendra fadnavis government banner and hoardings rmm
First published on: 25-10-2022 at 22:22 IST