scorecardresearch

“मी मुख्यमंत्र्यांना एक सोपं आव्हान देतो, त्यांनी…”, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल!

आदित्य ठाकरे म्हणतात, “ते गुवाहाटीला डोंगर-झाडी बघायला गेले होते, डाव्होसला ते बर्फ बघायला गेले होते. २८ तासांत ४० कोटी खर्च कसा होऊ शकतो? तुम्ही उधळपट्टी करायचं जरी ठरवलं, तरी…!”

aaditya thackeray slams eknath shinde
आदित्य ठाकरे व एकनाथ शिंदे (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

वरळीमध्ये मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाचे नेते आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली. तसेच, वरळी किंवा ठाण्यातून आपल्यासमोर निवडणूक लढवण्याचं आदित्य ठाकरेंचं आव्हान झुगारून देत आपण अशी छोटी आव्हानं घेत नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. या मुद्द्यावरून आणि मंगळवारी वरळीत झालेल्या भाषणांवरून सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगलेला असतानाच आदित्य ठाकरेंनी आज औरंगाबाद दौऱ्यादरम्यान माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर खोचक शब्दांत टीका केली आहे. तसेच, त्यांनी मुख्यमंत्र्यांना आणखी एक आव्हान दिलं आहे.

“गुवाहाटीत डोंगर तर डाव्होसला बर्फ बघायला गेले”

आदित्य ठाकरेंनी यावेळी मुख्यमंत्र्यांच्या डाव्होस दौऱ्यावरून टोला लगावला. “मुख्यमंत्री लढवणार आहेत का माझ्यासमोर वॉर्डमध्ये निवडणूक? चला तिथेही लढू. वेदांत-फॉक्सकॉन राज्यातून बाहेर गेल्यानंतर मी त्यांना चॅलेंज दिलं होतं की आपल्या राज्यातून उद्योग बाहेर का जात आहेत यावर माझ्याशी समोरासमोर डिबेट करा. पण ते त्यावर काहीही उत्तर देऊ शकले नाहीत. त्यानंतरही मोठे उद्योग राज्यातून बाहेर गेले.अजूनही उद्योगावर ते बोलू शकले नाहीत, आव्हान स्वीकारू शकले नाहीत. ते गुवाहाटीला डोंगर-झाडी बघायला गेले होते, डाव्होसला ते बर्फ बघायला गेले होते. २८ तासांत ४० कोटी खर्च कसा होऊ शकतो? तुम्ही उधळपट्टी करायचं जरी ठरवलं, तरी ४० कोटींचा खर्च होणार कसा? हा प्रश्न मला पडला. मी त्यांना म्हटलं यावर चर्चा करू. पण कुठेही त्यांच्याकडून उत्तर आलं नाही”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

“मी मुंबईतला रस्तेघोटाळा बाहेर काढला. माझ्या पत्रकार परिषदेनंतर पालिकेचा जवळपास ४५० कोटींचा खर्च वाचलाय. अजून त्यावर आम्ही बोलणार आहोत”, असंही त्यांनी नमूद केलं.

“…त्यामुळे ‘शिल्लकांनी’ नको तिथे बोटं खुपसू नयेत, नाहीतर…” मनसे आमदार प्रमोद पाटलांचा आदित्य ठाकरेंना इशारा!

“अधिवेशनातील राज्यपालांचं अभिभाषण…”

“काल मी त्यांना म्हटलं वरळीतून निवडणूक लढवून दाखवा. त्यावर काही उत्तर आलं नाही. मग मी त्यांना म्हटलं वरळीतून नाही, तर ठाण्यतून माझ्यासमोर निवडणूक लढवून दाखवा. तिथे मी यायला तयार आहे. पण आज मी त्यांना अजून एक आव्हान देतोय. माझी पहिली आव्हानं त्यांना स्वीकारायची नसतील, माझ्यासमोर लढायची त्यांच्यात ताकद नसेल, हिंमत नसेल, तर एक सोपं आव्हान मी त्यांना देतो. येत्या अधिवेशनात राज्यपालांचं अभिभाषण होण्याआधी या महाराष्ट्रद्वेष्ट्या राज्यपालांना त्यांनी बदलून दाखवावं”, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

“मुख्यमंत्र्यांना गल्ली-गल्लीत फिरायला लावणार” म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना शिंदे गटाचं प्रत्युत्तर; म्हणाले, “गल्लीत फिरणे म्हणजे…”

“मुख्यमंत्री दिल्लीत फक्त स्वत:साठी बोलतात”

“राज्यपालांनी देशाच्या महापुरुषांचा अपमान केला आहे. महाराष्ट्राचा अपमान करत आले आहेत. पण कुठेही त्यांना बदलण्याच्या हालचाली दिसत नाहीयेत. राज्यपालांनी स्वत: म्हटलंय की त्यांना बदली पाहिजे. पण कुठेही मुख्यमंत्री त्यावर एक शब्दही बोलत नाहीयेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्राचे विषय घेणं गरजेचं आहे. त्यांनी महाराष्ट्रासाठी दिल्लीत आवाज उठवणं गरजेचं आहे. दिल्लीत ते नेहमी स्वत:साठी बोलत आले.आज राज्यपालांविरोधात ते काहीच बोलले नाहीत. हे चित्र महाराष्ट्रासाठी घातक आहे. ही लढाई फक्त शिवसेनेसाठी महत्त्वाची नाही. आम्ही आधीही विरोधी पक्षात होतो, त्यात काहीही हरकत नाही. पण संविधान टिकणार की नाही यासाठी आमची ही लढाई आहे. आम्ही संविधानासाठी लढत आहोत”, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 11:16 IST
ताज्या बातम्या