आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिली असल्याची माहिती आज  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. पुढचा विचार केला जाईल तोपर्यंत आरे कारशेडमधलं एक पानही तोडता येणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही मोठी घोषणा केली आहे. रातोरात झाडांची कत्तल मंजूर नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. एका रात्रीतून झाडच काय झाडाचं पानही तोडता येणार नाही असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

विधीमंडळ पत्रकार संघाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. ठाकरे कुटुंबाने स्वतःसाठी काहीही केलं नाही हे सगळ्या पत्रकारांना माहित आहे. मी काहीही न सांगता मुख्यमंत्री झालो आहे. महागाई, भ्रष्टाचार, टंचाई या सगळ्याचा सामना आम्हाला करायचा आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मी न सांगता मुख्यमंत्री झालो आहे. मी मुख्यमंत्री म्हणून येईन असं काही सांगितलं नव्हतं असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

महागाई, टंचाई, भ्रष्टाचार यांचा सामना महाविकास आघाडीला करायचा आहे. मंत्रालयातल्या परंपरा, प्रथा मला ठाऊक नाहीत तरीही हे शिवधनुष्य उचललं आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. कराच्या रुपाने येणारा पैसा आपण कसा खर्च करतो? याचं उत्तर जनतेला द्यायचं आहे असंही प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मोठी आव्हानं पाहून मी पळून गेलेलो नाही. हे आव्हान स्वीकारलं आहे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.