scorecardresearch

“परबांनी उलटा सूर्यनमस्कार घालू नये, त्यांना…”, उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत आशिष शेलारांची टोलेबाजी!

भारतीय जनता पार्टीचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली आहे.

aashish shelar on anil parab
फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम

भारतीय जनता पार्टीचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली आहे. मुंबई महापालिकेनं हंगामी अर्थसंकल्प सादर करावा, या अनिल परबांच्या मागणीवरून आशिष शेलारांनी टीकास्त्र सोडलं. ज्यांच्या सरकारने शासन निर्णयाद्वारे महापालिका आयुक्तांकडे सर्व अधिकार सोपवले, आता तेच नेते स्वत:च्या सरकारने दिलेल्या अधिकारांवर मर्यादा आणण्याची मागणी करत आहेत, अशी प्रतिक्रिया आशिष शेलारांनी दिली.

खरं तर, शनिवारी (४ फेब्रुवारी) मुंबई महानगर पालिकेचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. पण मुंबई महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने सर्व प्रशासकीय अधिकार आयुक्तांना देण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबई प्रशासनाने केवळ हंगामी अर्थसंकल्प सादर करावा, अशी मागणी शिवसेना नेते अनिल परब यांनी केली. याबाबत विचारलं असता आशिष शेलारांनी टोलेबाजी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

हेही वाचा- “संघाच्या बागेत देवेंद्रजींची दरी…”, नागपूरमधील विजयानंतर मिटकरींची फडणवीस-बावनकुळेंवर टोलेबाजी!

‘मुंबई महापालिकेनं हंगामी अर्थसंकल्प सादर करावा’ या अनिल परबांच्या मागणीबाबत विचारलं असता आशिष शेलार म्हणाले, “अनिल परब यांच्यावर तथ्यांची पडताळणी न करता बोलण्याची वेळ आली आहे.कारण ७ मार्चला महापालिकेच्या सभागृहाचे सर्व अधिकार संपले होते. त्यानंतर तत्कालीन राज्य सरकारने शासन निर्णय जारी केला. या शासननिर्णयाद्वारे ठाकरे सरकारने महापालिका सभागृहाचे, महापालिकेचे, स्थायी समितीचे, सर्व समित्यांचे, सर्व अधिकार हे महापालिका आयुक्ताला दिले. याचा उल्लेख राज्य सरकारने स्वत: शासननिर्णयात केला आहे. त्यावेळी उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं.”

हेही वाचा- “जगात एकाच व्यक्तीला खूप घाबरते”, थेट नाव घेत पंकजा मुंडेंचं विधान!

“उद्धव ठाकरे यांच्या स्वाक्षरीने जारी केलेल्या शासननिर्णयाद्वारे सर्व अधिकार आयुक्तांना दिले होते. त्यामुळे हंगामी अर्थसंकल्प सादर करण्याचा प्रश्न येतोच कुठे? स्वत:च्या सरकारने दिलेल्या अधिकारांवर मर्यादा आणण्याची मागणी करणं म्हणजे उलटे सूर्यनमस्कार घालण्यासारखं आहे. उलटे सूर्यनमस्कार घालायला अनिल परबांना जमतील असं मला वाटत नाही. त्यांनी उलटा सूर्यनमस्कार घालूही नये,” असा टोला आशिष शेलारांनी लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 14:25 IST
ताज्या बातम्या