लहान मुलांना पळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका परप्रांतीय (पश्चिम बंगाल) आरोपीला बुधवारी नागरिकांनीच पकडून प्रसंगावधान दाखवत पोलिसांच्या स्वाधीन केले. या इसमाच्या अटेकमुळे यातील रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान एका छोटय़ा मुलीने शिताफीने या व्यक्तीच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतली. त्यानंतरच नागरिकांनी त्याला पकडले.
शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून छोटय़ा मुलांना पळवण्याच्या प्रकाराने धास्ती व्यक्त होते. याबाबतच्या काही प्रकारांबाबत शहरात चर्चा सुरू आहे. काही शाळांच्या परिसरात असे प्रयत्न झाल्याचे सांगण्यात येते. बुधवारी दुपारी सावेडी परिसरातील श्रमिकनगर येथे अशाच प्रयत्नात असलेल्या एकाला नागरिकांनीच पकडले. पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर नुरा इरफान शेख (राहणार पश्चिम बंगाल) असे त्याचे नाव असल्याचे समजले. या इसमाने दुपारी याच परिसरातील एका छोटय़ा मुलीला बोलावून तिला चॉकलेट देण्याचा बहाणा केला. याच परिसरातील नरेंद्र अवधूत यांची ही मुलगी होती. ती क्लासला जात असताना या इसमाने तिला गाठले. मात्र त्याच्या ताब्यातून स्वत:ची शिताफीने सुटका करून घेत या मुलीने लगेचच घर गाठले. घरी वडिलांना तिने हा प्रकार सांगितले.
तोपर्यंत या इसमाने याच परिसरात रस्त्यावरून जाणा-या एका छोटय़ा मुलाकडे मोर्चा वळवला होता. मात्र नागरिकांना शंका आल्याने त्यांनी प्रसंगावधान राखून या इसमाला धरून ठेवले. त्याने विरोध करण्याचाही प्रयत्न केला. मात्र पोलिसांना कळवल्यामुळे ते तातडीने दाखल झाल्यानंतर नागरिकांनी या इसमाला पोलिसांच्या ताब्यात दिले. याबाबत अवधूत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तोफखाना पोलीस ठाण्यात शेख याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची चौकशी सुरू आहे. या चौकशीत अशी कृत्ये करणारे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होते. या कृष्णकृत्यात हा इसम एकटा नसावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.