महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत आज सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, त्यापूर्वी या निर्णयाबाबत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी यासंदर्भात सूचक ट्वीट केले होते. “काय झाडी ,काय डोंगर, काय हिरवळ, आज वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ असं म्हणत त्यांनी विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, यावरून आता शिंदे गटाचे अब्दुल सत्तार यांनी राऊतांना टोला लगावला आहे.
काय म्हणाले अब्दुल सत्तार?
“नरहरी झिरवळांचा खेळ आता संपला आहे. आता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आहेत. जर आज विधानसभेचे अध्यक्ष नसते, तर कदाचित १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय झिरवळ यांच्याकडे आला असता. त्यावेळी नरहरी झिरवळ यांनी त्यांचं काम केलं, यापुढे राहुल नार्वेकर त्यांचं काम करतील”, अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली.
हेही वाचा – Maharashtra Political Crisis: अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “मला वाटतंय कदाचित…!”
पुढे बोलताना त्यांनी राहुल नार्वेकर यांच्या लंडन दौऱ्याबाबतही प्रतिक्रिया दिली. “सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काय येणार आहे, हे राहुल नार्वेकर यांना माहिती आहे. त्यामुळे ते निवांत आहे आणि लंडनला गेले आहेत. राहुल नार्वेकर हे कायद्याचे अभ्यासक आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय येईल, त्यानुसार काद्याच्या चौकटीत राहून निर्णय घेतील”, असे ते म्हणाले.
दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शिंदे गटाच्याच बाजुने लागेल, असा विश्वासही व्यक्त केला. “आजचा सर्वोच्च न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. आजचा निकाल लोकशाहीसाठी महत्त्वाचा आहे आणि हा निकाल आमच्या बाजूने लागेल, असा मला विश्वास आहे”, असे ते म्हणाले.