मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी महाराष्ट्रामधील राजकीय वातावरण तापवणारी एक याचिका निकाली काढली. जून महिन्यामध्ये शिवसेनेत उभी फूट पाडून बाहेर पडलेल्या शिंदे गटाने आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं यंदाच्या दसरा मेळाव्यासाठी दादरमधील शिवाजी पार्कवर परवानगी मिळवण्यासाठी केलेल्या अर्जावर न्यायालयाने सुनावणी केली. न्यायालयाने उद्धव ठाकरेंच्या गटाच्या बाजूने निर्णय देत मुंबई महानगरपालिकेवर परवानगी नाकारण्याल्याबद्दल ताशेरे ओढले. तसेच शिंदे गटाने ठाकरे गटाची याचिका रद्द करण्यासंदर्भात केलेली याचिकाही फेटाळून लावली. हा शिंदे गटासाठी एक मोठा धक्का तर ठाकरे गटाला पहिला न्यायालयीन विजय मानला जात आहे.

नक्की वाचा >> शिवाजी पार्कवर ठाकरेंचाच मेळावा : राज ठाकरेंच्या मनसेची पहिली प्रतिक्रिया; मैदानाचा उल्लेख करत म्हणाले, “वारसा मैदानाचा…”

असं असतानाच या निकालानंतर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडूनही या निकालावर प्रतिक्रिया नोंदवल्या जात असतानाच दुसरीकडे शिंदे गटाचा मेळावा वांद्रे कुर्ला संकुलामधील म्हणजेच बीकेसीच्या मैदानावर होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. एकीकडे शिवाजी पार्कसंदर्भातील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्याची चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे शिंदे गटाने मेळाव्याच्या निमित्ताने शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी केल्याची चर्चा आहे. या सर्व घडामोडींदरम्यान शिंदे गटातील नेते आणि शिंदे सरकारमधील मंत्री अब्दुल सत्तार यांनी या निकालाबद्दल भाष्य करताना न्यायालयाने शिंदे गटाऐवजी ठाकरेंना शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यासाठी परवानगी का दिली यासंदर्भातील कारण सांगितलं आहे.

नक्की पाहा >> ठाकरेंना शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी : निर्णयानंतर CM शिंदे पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले अन्…; पाहा Video

मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर वाशिममध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधताना सत्तार यांनी न्यायालयाच्या निकालाची सरकार अंमलबजावणी करेल असं म्हटलं आहे. “न्यायालयाने परवानगी दिलेली आहे. सरकार तो आदेश पाळेल,” असं सत्तार म्हणाले. तसेच शुक्रवारच्या सुनावणीमध्ये शिंदे गटालाही बीकेसीमध्ये मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळाल्याचंही सत्तार म्हटले.

नक्की वाचा >> “मुख्यमंत्री शिंदेंनी शिवाजी पार्कवर मेळावा घेतला असता तर…”; ठाकरेंना परवानगी मिळाल्यावर शिंदे गटाकडून दावा

“त्यांचा (ठाकरेंचा) मेळावा आणि आमच्या मेळाव्यालाही परवानगी मिळालेली आहे. आम्हाला बीकेसीवर मिळाली, त्यांना तिथे (शिवाजी पार्कवर) मिळाली. कारण त्यांचा अर्ज पहिला होता. आमचा अर्ज नंतरचा होता,” असंही सत्तार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. त्याचप्रमाणे त्यांनी, “सन्माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाचं महाराष्ट्र सरकार पालन करेल,” असा विश्वासही व्यक्त केला.