मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोजक्या मंत्रिसहका-यांसमवेतचा आजचा कराड दौरा चांगलाच धावपळ व गर्दी, गोंधळाचा ठरला. उभय नेतेमंडळी सकाळी सव्वादहा ते सायंकाळी सव्वाचार अशा सहा तासांच्या दौ-यावर होती. मात्र, उद्घाटनापाठोपाठ भूमिपूजन, अनावरण, प्रकाशन असे डझनभर कार्यक्रम समारंभपूर्वक पार पडले. त्यामुळे राज्याच्या कारभा-यांचा दौरा धावपळ व भाषणातच पार पडला.
विशेष म्हणजे काँग्रेस आघाडीच्या कारभा-यांच्या या भरगच्च कार्यक्रम दौ-यात राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष रामराजे निंबाळकर, बांधकाममंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री आर. आर. पाटील, खासदार उदयनराजे भोसले, ज्येष्ठ आमदार विलासराव पाटील-उंडाळकर ही नेतेमंडळी उपस्थित राहणार असल्याचे सूचित करण्यात आले होते. परंतु येनकेनकारणाने या नेतेमंडळींनी दौ-याकडे पाठ फिरवल्याने उपस्थितांमध्ये त्याची चर्चा पिकली होती. दरम्यान, ठिकठिकाणच्या कार्यक्रम व्यासपीठावर या मंत्रिमहोदयांची जागा, उपस्थित मंत्र्यांचे स्वीय सहायक, अधिक-यांनी भरून काढली. परिणामी मंत्र्यांची अनुपस्थिती, मंत्र्यांचे स्वीय सहायक, अधिका-यांची व्यासपीठावरील उपस्थिती, उपस्थित मंत्र्यांची धावपळ, कार्यक्रमांची रेलचेल, नेत्यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी केलेली रेटारेटी आणि त्यात पोलिसांचीच झालेली हेळसांड यामुळे महाराष्ट्राच्या नेतृत्वाचा कर्मभूमीतील हा दौरा धावता ठरताना, चांगलाच चर्चेचाही ठरला.  
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी दौ-याच्या प्रारंभी विद्यानगर येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या सांस्कृतिक भवनाच्या इमारतीचे भूमिपूजन केले. लगेचच सद्गुरू गाडगेमहाराज महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी वसतिगृहाचे उद्घाटन, मुलांच्या वसतिगृहाचे भूमिपूजन व दिशा या कर्मवीर विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. पृथ्वीराज चव्हाण ज्या टिळक हायस्कूलचे माजी विद्यार्थी होते, त्या ठिकाणी चव्हाण यांनी प्रथमच समारंभास उपस्थिती लावून हायस्कूल परिसरात उभारण्यात येणा-या यशवंतराव चव्हाण सभागृहाची पायभरणी केली. कराड पालिकेच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या दिवंगत लोकनेते व कराडचे ४२ वष्रे नगराध्यक्षपद भूषविलेले पी. डी. पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळय़ाचे आनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडले. दरम्यान, सुपर मार्केटजवळील यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय सभागृह व शासकीय विश्रामगृहाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन, आराखडय़ाची पाहणी असे भरगच्च कार्यक्रम पार पडले. या वेळी पृथ्वीराज चव्हाण व अजित पवार यांच्यासमवेत पालकमंत्री व जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, डी. पी. सावंत यांच्यासह स्थानिक नेत्यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमांची रेलचेल पाहता राज्याच्या नेतृत्वाचा हा कर्मभूमीतील दौरा कमालीचा धावपळीचा ठरला. यादरम्यान, मात्र नेत्यांची दगदग पाहतानाही स्थानिक कार्यकर्त्यांनी गाठीभेटी व निवेदनासाठी ठिकठिकाणी घुसखोरी करण्याचा ताकदीने प्रयत्न केल्याने पोलीस प्रशासनाचीच मोठी हेळसांड झाल्याचे विदारक चित्र होते. विश्रामगृहात नेतेमंडळी असताना दरवाजाच्या तोंडाशी डझनभर पोलीस अधिकारी व कर्मचा-यांची फौज असतानाही कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी केलेली झोंबाझोंबी व नेत्यांना भेटण्यासाठी तसेच निवेदन देण्यासाठी केलेली रेटारेटी पोलिसांना हातबल करणारी होती. अखेर मुख्यमंत्री आपल्या वाहनाकडे जाताना पोलिसांनी स्थानिक कार्यकर्ते व नेत्यांना रेटून बाजूला करताना, सर्वाचीच निराशाजनक हेळसांड झाल्याचे चित्र होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onगोंधळ
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Absence of leaders overburden of events and confusion
First published on: 05-10-2013 at 12:17 IST