Abu Azmi Demands Hindi Should be Declare National Language : राज्यात पहिलीपासून तीन भाषा शिकणं सक्तीचं करण्यात आलं आहे. तिसरी भाषा म्हणून हिंदी रेटण्याचा राज्य सरकारकडून प्रयत्न होत असताना त्याला राज्यातील जनतेकडून विरोध होत आहे. विरोधी पक्ष देखील जनतेची बाजू मांडत आहेत. मात्र, विरोधी बाकावरील समाजवादी पार्टीने मात्र राज्य सरकारचं समर्थन केलं आहे. सपाचे आमदार अबू आझमी यांनी तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवली पाहिजे असं म्हटलं आहे. त्याहून पुढे जात आझमी म्हणाले, “हिंदीला देशाची राष्ट्रभाषा म्हणून घोषित केलं पाहिजे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वांसाठी हिंदी भाषा शिकणं अनिवार्य केलं पाहिजे”.
अबू आझमी म्हणाले, “राज्य सरकारने तीन भाषा शिकणं अनिवार्य करण्याची अधिसूचना काढली आहे. महाराष्ट्रात पहिली मराठी भाषा आहे. दुसरी इंग्रजी आहे. आपले सगळे लोक इंग्रजीचे गुलाम झाले आहेत. आता राज्यात तिसरी कुठली भाषा शिकवणार आहात? गुजराती शिकवणार का? तिसरी भाषा म्हणून आपल्याकडे हिंदीचा पर्याय आहे. मी ५० वेळा सांगितलं आहे की केंद्र सरकारची संसदीय समिती आहे जी हिंदी भाषेला प्रोत्साहन देते. जी देशभर हिंदी पसरवण्याचं काम करते. केंद्र सरकारची सगळी कामं हिंदी भाषेत होतात. मात्र, काही लोक केवळ राजकारण करत आहेत. जनतेला मुर्ख बनवण्याचं काम करत आहेत”.
“हिंदीला देशाची राष्ट्रभाषा बनवली पाहिजे”
समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी म्हणाले, “महाराष्ट्रात पहिली मराठी भाषा आहे. मराठीला कोणी विरोध केलेला नाही. मात्र हिंदी संपूर्ण देशात अनिवार्य आहे. केंद्र सरकारची सगळी कामं हिंदीत व्हावी यासाठी एक समिती बनवण्यात आली आहे. ही समिती देशात हिंदीला पुढे नेण्याचं काम करत आहे. माझं म्हणणं आहे की हिंदीला देशाची राष्ट्रभाषा बनवली पाहिजे. केंद्र सरकारने तशी घोषणा केली पाहिजे”.
देशात एक भाषा असली पाहिजे : अबू आझमी
सपा आमदार म्हणाले, “देशात एक भाषा असली पाहिजे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतचे लोक बोलू शकतील अशी एक भाषा असावी. मी उद्या आसामाला गेलो तर..? मला तिथली आसामी भाषा बोलता येत नाही. मग मी काय आसामी भाषा शिकत बसू का? त्यामुळे देशात एक भाषा असली पाहिजे. जी संपूर्ण देशभर चालेल. तरी ज्यांना विरोध करायचा आहे त्यांनी विरोध करत बसावं”.