सांगली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी स्टुडंट्स ऑफ इंडिया या डाव्या विचारसरणीच्या संघटनेने घेतलेल्या भूमिकेचा शनिवारी सांगलीत अभाविपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निषेध केला. हा विरोध म्हणजे देशविरोधी भूमिका असल्याचा आरोपही या वेळी अभाविपकडून करण्यात आला.
अभाविपचे महानगर मंत्री अवनीश यादवाडे यांनी सांगितले, की छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या इतिहासातील एक सर्वश्रेष्ठ राष्ट्रपुरुष, हिंदवी स्वराज संस्थापक व राज्यकारभाराचे आदर्श होते. त्यांच्या नावाने स्थापन झालेल्या अध्ययन केंद्राला विरोध करणे म्हणजे भारतीय पराक्रमाच्या इतिहासाला विरोध करण्यासारखे आहे.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ अभाविपच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत डाव्या विचारसरणीचा घोषणाबाजी करत निषेध केला. या वेळी वंदे मातरम्, भारत माता की जय अशा घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान आम्ही सहन करणार नाही, असे सांगितले.