कराड : सीमेवर सेवा बजावताना लेह लडाख येथे सातारा जिल्ह्यातील खटावचे सुपुत्र जवान सुरज प्रताप शेळके ( वय २३ वर्षे ) यांचे श्वसनाच्या त्रासामुळे आकस्मित निधन झाले. गुरुवारी (दि २३)  संध्याकाळी लडाख रेजीमेंटकडून शेळके कुटुंबाला जवान सुरज शेळके यांचे प्रकृती अस्वास्थ्यामुळे निधन झाल्याचे कळवले असता शेळके कुटुंबासह खटाव ग्रामस्थांना मोठा धक्का बसला.

जवान सुरज शेळके यांचे प्राथमिक शिक्षण खटावमधील जिल्हा परिषद शाळेत झाले. तर माध्यमिक शिक्षण येथीलच श्री लक्ष्मी नारायण इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झाले होते. तर बारावी पर्यंतचे शिक्षण खटावच्या शहाजीराजे महाविद्यालयात झाले होते. नंतर ते आर्मीमध्ये सन २०१८ मध्ये भरती झाले. नाशिक येथे त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले होते. १४१ फिल्ड रेजिमेंटमध्ये सध्या ते लान्स नाईक या पदावर सेवा बजावत होते.  ते लडाख येथे सेवा  बजावत असताना अचानक त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना जवळच्याच सैनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यांची प्राणज्योत मालवली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जवान सुरज शेळके अवघ्या २३ वर्षांचे आणि अविवाहित होते. त्यांच्या पश्चात आई-वडील आणि एक भाऊ आहे. घरची परिस्थिती तशी हलाखीचीच आहे. वडील प्रताप शेळके खटाव येथील मिठाई व्यवसायीक यांचेकडे काम करतात. तर आई सुवर्णा अजूनही मोलमजुरी करतात. तर भाऊ गणेश पदवीधर असून तोही सैन्य भरतीसाठी प्रयत्नशील आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी सुरज शेळके सुट्टीवर गावी खटावला आले होते.