कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेतील कारभारावरून सध्या शहरात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यातून विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांना लक्ष्य करत गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. तर राजेश क्षीरसागर यांनीही यास प्रतिआव्हान दिले असून सतेज पाटील यांनी विधिमंडळाचे कायदे मला शिकवू नयेत असे सांगत शहरवासीयांच्या माथी मारलेल्या गळक्या काळम्मावाडी पाणी योजनेच्या कामाच्या चौकशीची मागणी त्यांनी विधीमंडळात करावी, असे आव्हान दिले आहे.

सतेज पाटील यांची टीका

आमदार राजेश क्षीरसागर यांचं काहीतरी काम राहिल असेल म्हणून ते अधिकाऱ्यांवर हक्कभंग आणतो म्हणत असतील, अशी खोचक टीका विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केली आहे.त्यांनी केवळ बोलू नये, तर त्यांनी आता कृती करावी. अन्यथा अधिकाऱ्यांवर ते कशासाठी हक्कभंग आणत आहेत, हे देखिल त्यांनी जाहीर करावे, असे आव्हान त्यांनी दिले.

पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, पाच वर्षांच्या प्रशासक काळात कोणाचा कोणाला पायपोस नाही. फुलेवाडीत अग्निशमन विभागाच्या इमारतीचा स्लॅब कोसळून मजूर ठार झाला. या कामाची निविदा कोणाच्या दबावाखाली देण्यात आली, याचे सत्य पुढे आले पाहिजे. आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले असले तरी त्यातून कोणालाही क्लीनचीट देऊ नये.

शहरात टाक्या उभे करण्याचे काम खाडे मक्तेदारांनी अजून केलेले नाही. त्या बदल्यात त्यांना २३ कोटींचा दंड लावण्यात आला असून, तो माफ व्हावा, यासाठी त्यांनी राज्य सरकारकडे मागणी केली आहे. त्यावरून कोणी माझ्या विरोधात बोलत असेल, तर मी तुमच्या विरोधात बोलेन, असा इशारा त्यांनी राजेश क्षीरसागर यांना उद्देशून दिला.

शहरातील पाणीपुरवठ्यावर राजकारण, आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा शहरातील दोन्ही आमदारांनी प्रशासनाची बैठक घेऊन शहरातील पाणीपुरवठ्यासंबंधी तोडगा काढायला हवा, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली. दोन्ही सत्ताधारी आमदारांनी १०० कोटींचे रस्ते कुठे गेले, रस्त्याचे काम योग्य दर्जाचे झाले की नाही, याची तपासणी करा, असे आव्हान त्यांनी दिले.शहरातील जी कामे होत आहेत, ती दर्जेदार आणि जनतेच्या हिताची झाली पाहिजे, अशी अपेक्षाही आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली.

राजेश क्षीरसागर यांचे प्रतिआव्हान

कोल्हापूर महानगरपालिकेत सत्ता उपभोगलेले तरीही जनहिताची कामे करण्यात अकार्यक्षम ठरणारे आमदार सतेज पाटील यांनी विधिमंडळाचे कायदे मला शिकवू नयेत. जनतेच्या प्रश्नासाठी अधिकाऱ्यांवर हक्कभंग आणणार म्हटल्यावर माजी पालकमंत्र्यांना अधिकाऱ्यांचा की ठेकेदारांचा पुळका आला आहे. शहरवासीयांच्या माथी मारलेल्या गळक्या काळम्मावाडी पाणी योजनेच्या कामाच्या चौकशीची मागणी त्यांनी विधीमंडळात करावी, असे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले.

क्षीरसागर म्हणाले, यावर्षी सणासुदीच्या काळातच आमदार पाटील यांनी अभ्यंगस्नान केलेली पाणी योजना बंद पडली. शहरातील माताभगिनींना पाण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले. तेव्हा प्रत्यक्ष पाणीपुरवठा ठिकाणांना भेट देवून अधिकाऱ्यांना योग्य सूचना देवून पर्यायी यंत्रणा सज्ज करून पाणीपुरवठा सुरळीत केला. याप्रश्नी आमदार सतेज पाटील यांनी एकही वक्तव्य केले नाही किंवा बैठक का घेतली नाही, याचा खुलासा करावा.

मला जनतेने ३० हजारांच्या मताधिक्याने निवडून दिले आहे. त्यामुळे जनतेसाठीच काम करणे माझे कर्तव्य समजतो. हे कर्तव्य पार पाडताना कोणालाही शिंगावर घ्यायला मागे पुढे पहात नाही. पण मागच्या दरवाजाने निवडून येणाऱ्यांना जनतेचे प्रश्न काय कळणार? असे आमदार क्षीरसागर म्हणाले.