आदिवासी शेतकऱ्यांनी आणलेल्या भुईमुगाला हमी दरापेक्षा कमी भाव मिळत असल्याचा निषेध करत आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली ‘प्रहार’ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अचलपूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी जाळपोळ केली. या आंदोलनात शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग घेत बाजार समितीच्या आवारात ठिय्या मांडला. त्यामुळे दिवसभर या ठिकाणी तणावाचे वातावरण होते.
मेळघाटातील आदिवासी शेतकऱ्यांचे भुईमूग कमी दराने खरेदी केले जात असल्याची तक्रार काही शेतकऱ्यांनी आमदार बच्चू कडू यांच्याकडे केली होती. यासंदर्भात कडू यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह बाजार समितीच्या कार्यालयाला धडक दिली. शेतकरी व कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन सुरू असतानाच काही कार्यकर्त्यांनी बाजार समितीच्या आवारात टायर्स जाळले. मुख्य इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील कार्यालयातील फर्निचरही जाळण्यात आले. अमरावतीहून कृषी आणि पणन विभागाचे काही अधिकारी चर्चेसाठी अचलपुरात पोहोचले होते. त्यांनाही कार्यकर्त्यांचा रोष सहन करावा लागला. काही कार्यकर्त्यांनी या अधिकाऱ्यांना धक्काबुक्कीही केली. कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवाळीची शुभेच्छापत्रांचा गठ्ठा आणला गेला होता. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात लोटून शुभेच्छापत्रे कशी काय देता, असा सवाल करून कार्यकर्त्यांनी तीही जाळून टाकली. ही आग लगेच विझवण्यात आली, पण आंदोलनकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांनी बंदोबस्त वाढवला.
शासकीय दराने खरेदी
*आदिवासी शेतकऱ्यांचे भुईमूग केवळ २५०० रुपये प्रती क्विंटल दराने खरेदी केले जात असून शेतमालाचे भाव पाडले जात आहेत, असे शेतकऱ्यांचे म्हणणे होते. बाजार समितीत ज्वारीची खरेदी सुरू न केल्याबद्दलही शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला.
*यासंदर्भात रविवारी आंदोलन पेटताच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय पाटील टवलारकर यांच्यासह काही संचालकांनी बच्चू कडू यांच्याशी चर्चा केली.
*त्यानंतर कडू यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा केली.
*त्यांनी भुईमुगाची खरेदी शासकीय दराने करण्याचे आदेश दिले आणि सोबतच ज्वारीचीही खरेदी सुरू करण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 28th Oct 2013 रोजी प्रकाशित
अचलपूर बाजार समितीत जाळपोळ
आदिवासी शेतकऱ्यांनी आणलेल्या भुईमुगाला हमी दरापेक्षा कमी भाव मिळत असल्याचा निषेध करत आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली ‘प्रहार’ संघटनेच्या

First published on: 28-10-2013 at 05:13 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Achalpur mla bachchu kadu protest set ablaze office