चेहऱ्यावर कपडा बांधून आलेल्या दोघांनी शहरातील मोगलाई भागात केलेल्या ‘अॅसिड’ हल्ल्यात गंभीर जखमी युवकाची प्रकृति चिंताजनक असून त्याच्यावर मुंबई येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.  पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून हल्लेखोरांना अटक करावी, या मागणीसाठी गवळी समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांना निवेदन दिले आहे.
मोगलाई भागात ३० नोव्हेंबरच्या रात्री सदाशिव अर्जुन गवळी (४२) रा. गवळीवाडा, यांच्या चेहऱ्यावर आणि पाठीवर दोघांनी अॅसिड फेकले. हल्लेखोरांनी आपले चेहरे कपडय़ाने बांधले होते. काही कळण्याच्या आत हा प्रकार घडला. सदाशिव यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. प्रथमोपचारानंतर त्यांना मुंबई येथे उपचारार्थ पाठविण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. त्यानंतर त्यांना मुंबई येथे रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृति चिंताजनक आहे. या प्रकारामुळे मोगलाई भागात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन तरुणांची चौकशी सुरू केली आहे. हल्लेखोरांचा उद्देश सदाशिव गवळी यांना जिवे मारण्याचा होता, यामुळे हल्लेखोरांना अटक करून कठोर शिक्षा करावी, अशी मागणी समाजाचे अध्यक्ष शिवाजी लंगोटे, शिवसेनेचे महानगर प्रमुख भूपेंद्र लहामगे, नगरसेवक भगवान गवळी आदींनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Acid attack victim boy serious
First published on: 03-12-2012 at 03:09 IST