नक्षलवाद्यांना शहरी भागात आसरा देणाऱ्या तसेच त्यांचे समर्थक असलेल्यांवर पोलिसांची कारवाई पुरावा मिळाल्यानंतरच होतच असते,ती यापुढेही सुरुच राहील, असे राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी मंगळवारी येथे स्पष्ट केले.
ते म्हणाले,ह्वनक्षलवाद्यांविरुद्ध पोलिसांची कारवाई निरंतर सुरूच असते. शहरी भागात त्यांचा प्रचार करणारे तसेच आसरा देणाऱ्या समर्थकांवरही कारवाई याआधीही झाली आहे आणि होत असते. काही महिन्यांपूर्वीच एका प्रकरणी शिक्षाही झाली आहे. नक्षलवादग्रस्त दहा राज्यांतील पोलीस प्रमुखांची बैठक केंद्रीय गृहमंत्र्यांनी गेल्या महिन्यात घेतली. नक्षलवाद्यांविरोधातील कारवाईचा त्यांनी आढावा घेतला. नक्षलवाद्यांचा नेटाने मुकाबला करा, त्यासाठी मिळेल ती मदत केंद्र शासनाकडून दिली जाईल. केंद्र व राज्य शासनाने संयुक्तपणे कारवाई करावी, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. देशातील सर्व पोलीस ठाणी संगणकाद्वारे जोडण्याचा ‘सीसीटीएनएस’ प्रकल्पाचे काम इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात गतीने सुरू आहे. नागपूरसह राज्यातही गुन्ह्य़ांचे प्रमाण वाढले वाढले असल्याची कबुली दयाल यांनी दिली. नागपूर वा इतरही कारागृहातून गुंडांना भ्रमणध्वनी सहज उपलब्ध होत असून धमक्या दिल्या जातात, खंडणी उकळल्या जाते, त्यावर कारवाई केव्हा करणार, असा प्रश्न केला असता कारागृहांसाठी स्वतंत्र प्रशासन असून त्यावर भाष्य करणे योग्य होणार नाही, असे दयाल यांनी स्पष्ट केले. आर्थिक गुन्ह्य़ांचे स्वरूप इतर गुन्ह्य़ांपेक्षा वेगळे असते. त्यामुळे त्याची तपास पद्धतीही वेगळी असते.
गुन्हा दाखल झाला म्हणजे प्रत्येकवेळी लगेचच अटक होऊ शकत नाही. भक्कम पुरावा मिळाल्यानंतर मग अटक केली जाते, असे एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले. पोलीस कोठडीतील मृत्यूप्रकरणांचा अभ्यास करण्यासाठी एक समिती तयार करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल न्यायालयाला सादर केला जाईल, त्यामुळे अधिक बोलणे योग्य होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.