निलंगा तालुक्यातील तेरणा नदीपात्रात अवैध वाळूउपसा व वाहतूक करणाऱ्या १५ वाहनांवर दंडात्मक कारवाई करून महसूल विभागाने सुमारे दीड लाख रुपये दंड वसूल केला.
तेरणा नदीपात्रात सरकारचा महसूल बुडवून होणारा अवैध वाळूउपसा व वाहतुकीवर र्निबध घालण्यासाठी तहसीलदार नामदेव टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाच्या पथकाने बुधवारी धडक कारवाई केली. पथकाने पहाटेस सावरी, सोनखेड व औराद शहाजनी गावांच्या शिवारात तेरणा नदीपात्रावर पाळत ठेवली. या वेळी अवैध वाळूउपसा व वाहतूक करणारे १३ ट्रॅक्टर व २ टिप्पर ताब्यात घेतले. काही वाहतूकदारांनी पथकाला हुलकावणी देऊन ट्रॅक्टरसह पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु तहसीलदारांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून ट्रॅक्टर वाळूसह ताब्यात घेतले व दंडात्मक कारवाई केली.
तेरणा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यातील पाणी पाटबंधारे विभागाने दरवाजा उघडून सोडल्यामुळे वाळूसाठा उघडा झाला होता. या वाळूवर डल्ला मारण्यासाठी वाळूमाफियांनी रात्री व पहाटे वाळूउपसा सुरू ठेवला होता. ताब्यात घेतलेल्या वाहनांचे मालक राजाराम सावनसुरे, परमेश्वर सोळुंके, मनोज पाटील, दयानंद सोळुंके, विश्वंभर पवार, चाँदपाशा पटेल (भारत कन्स्ट्रक्शन), बाबू नाईकवाडे, दयानंद पाटील, उज्ज्वल कन्स्ट्रक्शन, साधू सुरे यांच्याकडून १ लाख ४९ हजार २५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
मात्र, ४ वाहनधारकांनी दंड न भरल्याने त्यांची वाहने रात्री उशिरापर्यंत तहसील आवारात थांबवली होती. राजकीय पक्षसंघटनांच्या दबावाला न जुमानता वाळूमाफियांवर महसूल विभागाने केलेल्या दंडात्मक कारवाईचे जनतेत स्वागत केले जात आहे. तहसीलदार नामदेव टिळेकर, नायब तहसीलदार शिवाजी कदम, एस. बी. डोंगरे, तलाठी देशमुख, आदींसह १५ कर्मचारी व फक्त दोन पोलीस कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते.