​सावंतवाडी: मालवणच्या सागरी हद्दीत बेकायदेशीरपणे मासेमारी करणाऱ्या कर्नाटक राज्यातील एका ‘हायस्पीड ट्रॉलिंग’ नौकेला सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने आज पहाटेच्या सुमारास ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ आणि सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

​गेल्या काही काळापासून राज्याच्या सागरी हद्दीत घुसून मासेमारी करणाऱ्या परराज्यातील नौकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मच्छीमार करत आहेत त्यामुळे मत्स्य विभागाकडून अशा नौकांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

​ मत्स्य विभागाचे अंमलबजावणी अधिकारी गणेश टेमकर आणि त्यांचे सहकारी मालवणसमोर १० सागरी मैल पाण्यामध्ये गस्त घालत असताना, त्यांना कर्नाटक राज्याच्या जलक्षेत्राचा परवाना असलेली ‘श्री शिवतेजा’ ही नौका महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बेकायदेशीरपणे मासेमारी करताना आढळून आली. ही नौका कुमठा, उत्तर कन्नड, कर्नाटक येथील श्री. किशन यांच्या मालकीची आहे.

​मत्स्य विभागाने तातडीने कारवाई करत नौकेवरील तांडेल (नौकाचालक) आणि इतर खलाशांसह ही नौका जप्त केली. या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.