राजकीय नेते त्यांच्या अभिवेशात आणि अभिनेते त्यांच्या शैलीत पाहण्याची सवय लागलेली. पण कागलच्या मंचावर नेता-अभिनेता बनला अन् अभिनेता नेता! अशी भूमिकांची अदलाबदल उपस्थितांनी सुखावून गेली. दोन्ही भूमिकांना टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद मिळाला.
कागल येथे सायंकाळी महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पोहोचू शकले नाही. त्यामुळे सर्वांच्याच नजरा अभिनेते प्रमुख पाहुणे, अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर खिळल्या होत्या.

तत्पूर्वी कार्यक्रमाचे संयोजक ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मनोगत व्यक्त केले. पुतळा अनावरणाचा संदर्भ देत त्यांनी महापुरुषांच्या विचारांचे महत्त्व विशद केले. त्यानंतर या नेत्याच्या अंगी अभिनेता घुसला. मंत्री मुश्रीफ यांनी अभिनेते नाना पाटेकर यांच्या चित्रपटातील संवाद म्हणून दाखवले.

“साले अपने खुद के देश में एक सुई नहीं बना सकते…,और हमारा देश तोड़ने का सपना देखते हैं …”, याचबरोबर… “ये मुसलमान का खून ये हिंदू का खून…. बता इस में मुसलमान का कौन सा हिन्दू का कौनसा बता?” या मुश्रीफांनी केलेल्या डायलॉगबाजीला पाटेकर यांच्यासह उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद नोंदवला.

त्यानंतर वेळ आली होती नाना पाटेकर यांची. पाटेकर यांनी मुश्रीफ हे अभिनेते असल्याचे सोदाहरण स्पष्ट केले. मुश्रीफ यांच्या देखण्या चेहऱ्याचा संदर्भ देऊन त्यांनी लहानपणी मर्फी रेडिओच्या जाहिरातीत बालकाची भूमिका निभावली होती, असा संदर्भ दिल्यावर वातावरण हलके झाले. त्यांच्या या खुमासदार टिपणीला दिलखुलास हसून दाद दिली गेली.

पाटेकर यांनी नंतर नेत्याच्या आविर्भावात भाषण केले. महापुरुषांचे पुतळे उभारून चालणार नाही. त्यांच्या विचाराने जाण्याची गरज आहे. २५ वर्षा मुश्रीफ निवडून येतात ही साधी गोष्ट नाही. पुढच्या निवडणुकीत ते उभे आहेत असे म्हंटले तर लोक निवडून देतील. पण सत्ताधाऱ्यांनी आमच्यासारख्या सामान्य जनतेचे प्रश्न सोडवावेत, अशी नेत्यांची स्टाईलमध्ये भाषण केले. त्यालाही लोकांनी प्रतिसाद दिला. इतक्यावरच न थांबता पाटेकर यांनी मुश्रीफ यांना तुम्ही अभिनयात या, मी राजकारणात येतो; अशी टिप्पणीही केली.

अखेरीस, या अभिनेत्याला अभिनय केल्यावाचून जाऊ देतील ते कागलकर कसले? त्यांनी पाटेकर यांना त्यांचे काही संवाद म्हणण्याची विनंती केली. त्यावर पाटेकर यांनी हिंदी आणि एक नाटकातील संवाद आपल्या शैलीत म्हणून दाखवला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“एक मच्छर, साला एक मच्छर इंसान को आदमी से हिजड़ा बना देता है ; एक खटमल पूरी रात को अपाहिज कर देता है.” या पाठोपाठ त्यांनी नटसम्राट नाटकातील “जगाव की मराव हा एकच सवाल आहे. ह्या दुनियेच्या ऊकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदान? का फेकुन द्याव देहाच लखतर मृत्यूच्या काळाशार डोहामध्ये.. ” हा संवाद सादर केला.