मुंबईतील १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटात अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या अभिनेता संजय दत्त याची येत्या २७ फेब्रुवारीला कारागृहातून सुटका होण्याची शक्यता आहे. गृहमंत्रालयानेही संजय दत्तच्या सुटकेला मंजूरी दिल्याचे सूत्रांकडून समजत आहे. त्यामुळे संजय दत्त शिक्षा पूर्ण होण्याच्या १०७ दिवस आधीच तुरूंगवासातून मुक्त होण्याची शक्यता आहे. संजय दत्त सध्या येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी संजय दत्तची उर्वरीत शिक्षा रद्द करण्याची परवानगी दिल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र पाटील यांच्या कार्यालयाकडून याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
गेल्या काही दिवसांपासून संजय दत्तच्या शिक्षामाफीची चर्चा सुरू आहे. त्यामुळे राज्य सरकार संजय दत्तला विशेष वागणूक देत असल्याचे आरोप सुरू झाले होते. मात्र, अतिरिक्त पोलीस महासंचालक (तुरूंग) भूषण उपाध्याय यांनी मध्यंतरी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत संजय दत्तला शिक्षेत मिळालेली सवलत नियमबाह्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. जेल मॅन्युअलच्या नियमानुसार प्रत्येक कैद्याला महिन्याला सात दिवसांची रजा माफ केली जाते. यानुसार कैद्याची वर्षभरात ८४ दिवसांची शिक्षा कमी होते. याशिवाय, कैद्याची तुरूंगातील वागणूक चांगली असेल तर प्रत्येक वर्षी आणखी ३० दिवसांची शिक्षा माफ केली जाते. या हिशेबाने संजय दत्तची वर्षाला ११४, तर पाच वर्षांत ५७० दिवसांची शिक्षा माफ करणे नियमाला धरून आहे. या व्यतिरिक्त तुरूंग अधीक्षकांना ३० दिवसांची, उपमहासंचालकांना ६० दिवसांची आणि अतिरिक्त पोलीस महासंचालकांना ९० दिवसांपर्यंत शिक्षा माफ करण्याचा अधिकार असतो.
१९९३ मधील बॉम्बस्फोटांच्यावेळी अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोषी ठरवल्यानंतर संजय दत्तची १६ मे २०१३ ला येरवडा कारागृहात रवानगी झाली होती. सर्वोच्च न्यायालयाने संजय दत्तला मे २०१३ मध्ये पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यापैकी दीड वर्षांची शिक्षा संजयने आधीच भोगली होती. त्यामुळे पुढची साडेतीन वर्षे त्याला तुरुंगात घालवायची होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor sanjay dutt to be released from yerwada jail on february
First published on: 06-01-2016 at 12:14 IST