मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी आरे कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांच्या या निर्णयानंतर वृक्षप्रेमी आणि अभिनेता सयाजी शिंदे यांनी या निर्णयाचं स्वागत करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन केलं आहे. तसंच आता ”यापुढे ‘आरे’मध्ये येताना निदान पाच झाडं तरी घेऊन या”, असं आवाहन केलं आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलत असताना त्यांनी जनतेला आवाहन केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘टीव्ही९ मराठी’नुसार, पुढचा विचार केला जाईल तोपर्यंत आरे कारशेडमधलं एक पानही तोडता येणार नाही, असा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. त्यांच्या या निर्णयानंतर सर्व स्तरांमधून विविध चर्चा रंगत आहेत. यामध्येच ‘आरे’मध्ये कारशेड व्हावं किंवा होऊ नये, मेट्रो व्हावी की नाही हा निर्णय शासनाचा आहे. पण विकासाच्या नावाखाली झाडं तोडली जाऊ नयेत. उद्धव ठाकरे यांनी आता या पुढे आरे कॉलनीतील एक पानही तोडू देणार नाही, असं विधान केलं. त्यांच्या या विधानाचा मी महाराष्ट्रातील वृक्षप्रेमींच्या वतीने स्वागत करतो. आम्ही दर रविवारी आरेमध्ये झाडे लावण्यासाठी जातो. ज्यांना या कामामध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे, त्यांना या पुढे आरे कॉलनीमध्ये येताना निदान पाच झाडं तरी घेऊन या,असं सयाजी शिंदे यांनी सांगितलं.

सयाजी शिंदे यांनी प्लास्टिकमुक्त आरे आणि झाडांनीयुक्त आरे करण्याची नवीन मोहिम हाती घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या या मोहिमेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सहकार्य मिळावे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पुढचा विचार केला जाईल तोपर्यंत आरे कारशेडमधलं एक पानही तोडता येणार नाही अशी मोठी घोषणा केली . रातोरात झाडांची कत्तल मंजूर नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. एका रात्रीतून झाडच काय झाडाचं पानही तोडता येणार नाही, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor sayaji shinde welcomes cm uddhav thackerays decision about aarey forest metro car shed ssj
First published on: 01-12-2019 at 10:52 IST