विधानसभा अध्यक्ष म्हणून भाजपच्या राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. विधीमंडळातली पहिली लढाई शिंदे यांनी जिंकली आहे. राहुल नार्वेकर यांना १६४ मतं मिळाली. त्यानंतर राहुल नार्वेकर यांचा पदग्रहण सोहळा पार पडला. सर्व सदस्यांनी राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन केलं. यावेळी बोलताना शिवसेना आमदार आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे.

“सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवारांना कानात सांगायला पाहिजे होते असं सांगितलं. आम्ही फडणवीसांच्या कानात सांगितलं तसं ऐकलं असतं तर ही परिस्थिती असती अडीच वर्षापूर्वीच दिसली असती,” असं टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.

“आजचे उपमुख्यमंत्री हे एवढे हुशार आहेत की त्यांनी राहुल नार्वेकरांना वर बसवले आहेत. कारण त्यांची राष्ट्रावादी काँग्रेससोबत जवळीक नको अशी कुरबुर होती. म्हणून ज्यांची राष्ट्रवादीसोबत जास्त जवळीक आहे त्यांनाच वर बसवले आहे,” असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

पळालेल्या आमदारांनी डोळ्यात डोळे घालून पाहण्याची हिंमत केली नाही – आदित्य ठाकरे

“बंडखोर आमदारांनी व्हीप मोडलेला आहे आणि उपाध्यक्षांकडे याचा विरोध केला आहे. एकाही पळालेल्या आमदाराने डोळ्यात डोळे घालून पाहण्याची हिंमत केली नाही. सगळे डोळे चोरून खाली किंवा दुसरीकडे बघत होते. आज त्यांनी आमच्याकडे पाहिले नाही पण मतदारांकडे गेल्यानंतर काय सांगणार?” असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला.

दरम्यान, भाजपाने शिवसेनेमधील बंडखोर गटाला समर्थन देत बंडखोर आमदारांचे नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घातल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षांपूर्वी युतीमध्ये मतभेद निर्माण होण्याआधीच हे केलं असतं तर अधिक चांगलं झालं असं म्हणत खंत व्यक्त केली होती. शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनीही अडीच वर्षांपूर्वी याच मुद्द्यावरुन शिवसेना भाजपामध्ये मतभेद झाल्याचं म्हटले.