२० जून हा जागतिक खोके दिन आहे. कारण ज्या लोकांनी आपल्याशी गद्दारी केली त्यांच्या गद्दारीची दखल ३३ देशांनी घेतली असं म्हणत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं शिबीर मुंबईत होतं आहे या शिबीरात कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना आदित्य ठाकरेंनी ही टीका केली आहे.

काय म्हटलं आहे आदित्य ठाकरेंनी?

या राज्यात काही लोक असे आहेत जे दुसऱ्यांचे वडील चोरणारे आहेत. दुसऱ्यांच्या वडिलांसह आपले फोटो टाकून आपलं राजकीय करिअर पुढे कसं न्यायचं हे या लोकांना माहित आहे. आज चांगला दिवस आहे आज कुणीही त्यांची नावं घेऊ नका. पण वर्षभरापूर्वी जेव्हा गद्दारी झाली तेव्हा माझ्या वडिलांचा फोटो आणि नाव नेण्याचा प्रयत्न झाला. मात्र माझ्या वडिलांनी दाखवलं ते काय आहेत. माझ्या आजोबांच्या आशीर्वादाने लवकरच सगळं काही स्पष्ट होणार आहे.

हे पण वाचा- “सुप्रिया सुळे मुख्यमंत्री अन् आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री असतील”, पवार-ठाकरेंच्या प्लॅनबाबत बावनकुळेंचा मोठा दावा

२० जून हा जागतिक खोके दिन

शिवसेनेचा वर्धापन १९ जून रोजी आहे. पण काही लोकांनी आजच ट्वीट केलंय. घटनाबाह्य सरकारमधले उपमुख्यमंत्री त्यांनी उद्याच्या शुभेच्छा आजच दिल्या आहेत. दिल्लीतून त्यांना निरोप आला असेल. परवा म्हणजेच २० जूनला सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे. जागतिक खोके दिन. राष्ट्रीय नाही, राष्ट्रीय खोके दिवस म्हणू नका. जागतिक खोके दिन आहे कारण ३३ देशांनी त्याची दखल घेतली आहे. मी आत्ता लंडनमध्ये होतो तिथे मला एकाने विचारलं की पुढे काय करणार आहात? तेव्हा मी सांगितलं की १८ तारखेला शिबीर आहे, १९ जूनला वर्धापन दिन आहे. २० तारखेला मी म्हटलं ५० खोके तेव्हा तिथून एक फॉरेनर चालला होता तोपण म्हणाला एकदम ओके. त्यामुळे परवाचा दिवस हा जागतिक खोके दिवस आहे असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.