आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाची मोर्चेबांधणी सुरु आहे. दरम्यान अनेक जिल्ह्यांमध्ये भाजपात वेगवेगळ्या पक्षांमधून इनकमिंग चालू आहे. दरम्यान, कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेच्या दोन्ही गटांमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. यावरून शिवसेना (शिंदे) व भाजपात तणाव निर्माण झाला आहे. या घटनेचा निषेध म्हणून आज (१८ नोव्हेंबर) मुंबईत पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीवर शिवसेनेच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकल्याचा दावा केला जातो आहे. एकनाथ शिंदेच फक्त बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान आदित्य ठाकरेंनी पोस्ट लिहित एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेत्यांना चिमटे काढले आहेत.
काय आहे आदित्य ठाकरेंची पोस्ट?
असं कळलंय की आज मिंधे टोळीच्या मंत्र्यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. गेलेच नाहीत! का? तर म्हणे राग आलाय! भयंकर राग! मुख्यमंत्र्यांवर आणि भाजपावर! निवडणुकीतलं जागावाटप आणि म्हणे ह्यांचा पक्ष फोडतात म्हणून! याला म्हणतात चोर मचाये शोर!
पण ह्यांच्या स्वार्थापोटी राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकणं म्हणजे महाराष्ट्राचा आणि इथल्या जनतेचा अपमान आहे! मंत्रिमंडळ बैठका जनतेचे प्रश्न सोडवायला असतात, तुमचे रुसवे फुगवे सांभाळायला नाहीत! कसा चाललाय हा कारभार?! महाराष्ट्रासाठी हे सगळं चिंताजनक आहे. चला, आज परत कोणीतरी गावी जाणार.
सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
शिवसेनेसोबत ची तीस वर्षाची मैत्री ज्या भाजपने निभावली नाही ते ३० महिन्यात शिंदेंना जवळ करतील काय ? ये तो बस झाकी है… और बहुत कुछ देखना बाकी है. अशी पोस्ट सुषमा अंधारे यांनीही केली आहे. अशी पोस्ट सुषमा अंधारे यांनी केली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
“राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लगबग चालू आहे. अनेक मंत्री आपापल्या जिल्ह्यांमध्ये आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीत तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांची संख्या कमी होती. मंत्र्यांच्या गैरहजेरीचं दुसरं कुठलंही कारण नव्हतं. दुसरा कुठलाही विषय नाही. अनेक मंत्री हे वेगवेगळ्या जिल्ह्यांचे प्रभारी आहेत. त्यामुळे ते त्या-त्या जिल्ह्यांमध्ये आहेत. या मंत्र्यांनी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परवानगी घेतली होती. त्यानंतर ते आपापल्या भागात गेले आहेत.”
उदय सामंत यांनी याबाबत काय म्हटलं आहे?
शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नाराजीवर मंत्री उदय सामंत म्हणाले, आम्हाला जे हवं आहे ते आम्ही एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनाच सांगणार. त्यामुळे शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले. बाकी योगायोगानेच मंत्री बैठकीला अनुपस्थित होते. असे योगायोग भविष्यात अनेक वेळा येतील. आजची बैठक ही खेळीमेलीच्या वातावरणात पार पडली आहे. मी आरोग्य तपासणीसाठी गेलो होतो. त्यामुळे मी बैठकीला उपस्थित नव्हतो. मात्र, आमचे प्रमुख नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या बैठकीला हजर होते. आमच्या मनात जे होतं ते आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे.
