रोजगार हमी योजनेअंतर्गत आदिवासी मजुरांना काम देण्यात प्रशासन अपयशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निखिल मेस्त्री, लोकसत्ता

पालघर : टाळेबंदीमुळे हातावर पोट असणाऱ्या आदिवासींची मोठी परवड होत असतानाच डहाणू तालुक्यातील ७,५४९ मजुरांना रोजगार हमी योजने अंतर्गतची कामे उपलब्ध करून देण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. यासाठी या मजूर ग्रामस्थांनी सामाजिक अंतर राखत प्रशासनाच्या निष्क्रियतेचा प्रतिकात्मक निषेध केला आहे.

डहाणू तालुक्यातील ७,६१७ मजुरांनी रोजगार हमी योजने अंतर्गत कामाची मागणी केली गेली होती. मागणी केल्यानंतरही रविवापर्यंत ७,५४९ मजुरांना काम उपलब्ध करून देण्यात प्रशासन अपयशी ठरले. बहुतांशी मजुरांनी कामाची मागणी करून दोन आठवडे उलटून आहेत. त्यामुळे बेरोजगारी भत्ता देण्याची मागणी या मजुरांनी यानिमित्ताने केली आहे.

याबाबत कष्टकरी संघटनेने एप्रिल महिन्यातील केलेल्या पाठपुराव्यामुळे रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी यांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना गावोगावी रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे द्यावीत असे निर्देश दिले होते. मात्र प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे ही कामे लालफितीत अडकून बसली आहेत. रोजगार हमी योजनेच्या कामाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामसेवक हा महत्त्वाचा घटक असला तरी ग्रामसेवकांनी मागणी असलेल्या गावातील मजुरांना अजून एकदाही भेट दिलेली नाही असा आरोप या निमित्ताने होत आहे.

घरकुल बांधकाम संबंधीच्या यादीत नाव असलेल्या अनेक मजुरांना रोजगार हमी योजनेअंतर्गत संभाव्य मजुरांच्या यादीतून वगळण्यात येत आहे. वास्तविक घरकुलाचे बांधकाम पंधरा दिवसांपेक्षा अधिक चालत नाही व कामाची मागणी करणाऱ्या मजुरांना २० जूनपर्यंत कामाची मागणी केली आहे. म्हणजेच असे करून प्रशासन मजुरांना उरलेल्या दिवसांसाठीच्या कामापासून वंचित ठेवत आहे असेच एकंदरीत दिसत आहे.

आहे ती कामे खूप कमी दिवस पुरणारी

जिथे कामे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत तिथे खूपच कमी मजूर कामावर ठेवण्यात आलेले आहेत किंवा उपलब्ध करून देण्यात आलेली कामे खूप कमी दिवस पुरणारी आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर पाळणे शक्य होणार नाही असे प्रशासन मार्फत सांगून काही कामे सुरू करण्यात आलेली नाही. मात्र असे असले तरी वन तलाव, दगडी बांध बांधणे अशी कामे सामाजिक अंतर पाळून करता येण्यासारखी आहेत असेही कष्टकरी संघटनेने निदर्शनास आणून दिले आहे. वनहक्क कायद्यांतर्गत वन हक्क मान्य करण्यात आलेल्या वनजमिनींवर विकासाची कामे करण्यासाठी वनखाते अजूनही आडकाठी करत आहे असा आरोप यावेळी केला जात आहे.

जिल्ह्यात २६७७ कामे सुरू असून यामध्ये ३२ हजार ८०३ मजुरांना काम आहे. ही आतापर्यंतची जिल्ह्यची विक्रमी नोंद आहे. डहाणू तालुक्यात ३८० कामे सुरू असून २०३६ मजूर उपस्थिती आहे, ती वाढतच जाणार आहे.

– दीपक चव्हाण, उपजिल्हाधिकारी, मनरेगा

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Administration fails to provide employment to tribal laborers under employment guarantee scheme zws
First published on: 15-05-2020 at 01:05 IST