जालना : जालना ते जळगाव या १७४ किलोमीटर लांबीच्या नवीन रेल्वेमार्गासाठी सध्या भौतिक सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. परंतु या मार्गासाठी आता हवाई सर्वेक्षणही करण्यात येणार आहे. त्यासाठी अकोला येथे शुक्रवारी विमान दाखल झाले असून त्या माध्यमातून रडार (लिडार)चा वापर करून हे हवाई सर्वेक्षण केले जाणार आहे.

सुमारे तीन महिन्यांपूर्वी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या नवीन रेल्वेमार्गाच्या ‘फायनल लोकेशन सव्‍‌र्हे’स जवळपास साडेचार कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आल्याची घोषणा केली होती. या मार्गाच्या सर्वेक्षणाची गेल्या ८ फेब्रुवारी रोजी मंजुरी देण्यात आल्यानंतर दोन महिन्यातच म्हणजे मार्चच्या शेवटच्या आठवडय़ात प्रत्यक्ष भौतिक सर्वेक्षणास सुरुवात झाली. मध्य रेल्वेच्या मुंबई येथील सर्वेक्षण विभागातील तीन अधिकाऱ्यांच्या पथकाने नियोजित मार्गाच्या संदर्भात पाहणी केली.

आता १४ ते १७ मे दरम्यान या मार्गाचे हवाई सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या विमानामुळे एका दिवसात ५० किलोमीटरचे सर्वेक्षण करता येणार आहे. या नियोजित मार्गापैकी ७० टक्के भाग जालना लोकसभा मतदारसंघातून जातो. या मार्गामुळे मराठवाडय़ातील ग्रामीण भागातील औद्योगिक विकासासह दळणवळण, शेती, व्यापार, पर्यटन इत्यादीच्या विकासासा चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे. जालना जिल्ह्यातील प्रसिद्ध राजूर गणपती मंदिर आणि अजिंठा पर्यटन स्थळास भेट देणाऱ्यांसाठी हा मार्ग उपयुक्त ठरणार आहे. जालना लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे रावसाहेब दानवे हे रेल्वे राज्यमंत्री असल्याने या मार्गाविषयीच्या जनतेतील अपेक्षा वाढल्या आहेत. गेल्या मार्चमध्ये मुदखेड ते मनमाडदरम्यान रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण करण्याच्या शुभारंभासाठी जालना येथे आयोजित कार्यक्रमात दानवे यांनी जालना ते जळगाव रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाच्या संदर्भात माहिती दिली होती. रेल्वेमंत्री अश्विनीकुमार यांच्याशी या मार्गाच्या संदर्भात त्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले होते.

अनेक वर्षांची मागणी

जालना ते जळगाव रेल्वेमार्गाची या भागातील जनतेची अनेक वर्षांची मागणी आहे. या मार्गाचा उपयोग गुजरात, राजस्थानमधील गाडय़ांना, दक्षिण भारतात जाण्यासाठी होईल. या मार्गाचे सर्वेक्षण आणि काम लवकर पूर्ण व्हावे असे प्रयत्न आहेत. ग्रामीण भागातील शाश्वत विकासाच्या दृष्टीने हा मार्ग महत्त्वपूर्ण ठरणार आहे. चार दिवसांत होणारे हवाई सर्वेक्षण या मार्गाच्या संदर्भात महत्त्वाचे आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

-रावसाहेब दानवे,  रेल्वे राज्यमंत्री