अहिल्यानगर : आमदार संग्राम जगताप यांना धमकीचा संदेश आल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) पदाधिकाऱ्यांनी, आज (गुरुवारी) जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेत आमदार जगताप व त्यांच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्याची मागणी केली. पोलिसांनी धमकी देणाऱ्यांवर त्वरित कारवाई न केल्यास जिहादी प्रवृत्तीच्या लोकांना धडा शिकवण्याचा इशाराही पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर व माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, विनीत पाऊलबुद्धे, अविनाश घुले, अजिंक्य बोरकर, आशा निंबाळकर, माणिक विधाते, बाळासाहेब पवार, सुरेश बनसोडे, दीपक खेडकर, रेश्मा आठरे, सागर बोरुडे, साधना बोरुडे, मयूर बांगरे, लतिका पवार, युवराज शिंदे, सनी कोवळे, नितीन घोडके, राजेश भालेराव, श्रेणिक शिंगवी, गिरीश जगताप, अंजली आव्हाड, सुनंदा शिरवळे, धीरज उकिर्डे यांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांची भेट घेतली.

निवेदनात म्हटले आहे, की आमदार संग्राम जगताप हे हिंदू धर्माच्या प्रचाराकरता सभा मोर्चा व आरत्या करण्याकरिता महाराष्ट्रभर जात आहेत. त्यामुळे त्यांना काही विशिष्ट धर्मातील लोक जाणीवपूर्वक लक्ष्य करीत आहेत. प्रसारमाध्यमांवर जगताप यांच्या विरोधात चिथावणीखोर वक्तव्ये केली जात आहेत. जगताप यांचे स्वीय सहायक सुहास शिरसाठ यांना मोबाइलवर जगताप यांना धमकावणारा संदेश पाठवण्यात आला. विशिष्ट धर्माचे काही लोक हे जाणीवपूर्वक जगताप यांना लक्ष्य करून त्यांच्या जीवितास धोका निर्माण होईल, अशी वक्तव्ये करत आहेत. धमक्या देणाऱ्या लोकांपासून जगताप व कुटुंबीयांच्या जिवास घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे धमकी देणारी व्यक्ती व चिथावणीखोरावर तातडीने कठोर कारवाई करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनधिकृत फलक मनपाने हटवावेत

महापालिकेने शहरातील अनधिकृत फलकांवर कारवाई करावी, आम्ही त्यांना पोलीस संरक्षण देऊ, असेही पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी शिष्टमंडळाला सांगितले.