कराड : थोर व्यक्तिमत्व संघर्षातूनच घडलीत, संघर्षातूनच मोठी माणसं घडतात. विचारवंत, पत्रकार सुधारककार गोपाळ गणेश आगारकर यांनाही मोठा संघर्ष करावा लागल्याचे सांगताना, आगरकरांचे स्मारक राष्ट्रासाठी समाज प्रबोधनाचे केंद्र असावे, अन् ते पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात असावे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश भोसले यांनी व्यक्त केली.

सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्या १६९ व्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय पत्रकारिता आणि विविध पुरस्कारांच्या वितरण सोहळ्यात ते बोलत होते. इंद्रधनू विचारमंच फाउंडेशनतर्फे येथील सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयात आयोजित या कार्यक्रमाला शिक्षण संस्थेचे प्रमुख सारंग पाटील, प्राचार्य डॉ. मोहन राजमाने, उद्योजक रामकृष्ण वेताळ, टेंभूच्या सरपंच रुपाली भोईटे, इंद्रधनू विचारमंचचे विश्वस्त प्रमोद तोडकर, संदीप चेणगे, अशोक मोहने, माणिक डोंगरे, नितीन ढापरे, विकास भोसले आदी उपस्थित होते.

डॉ. सुरेश भोसले म्हणाले, आगरकरांच्या विचारांची उजळणी आणि जपणूक करणं ही काळाची गरज आहे. त्यासाठी त्यांच्या स्मारकाची आज येथे गरज व्यक्त होत असली तरी हे स्मारक कशा पद्धतीचे असावे, आगरकरांच्या लिखाणाचा संग्रह, लेख उपलब्ध आहेत का, असतील तर त्याचा संग्रह कोण करणार, त्यावर संशोधन झाले पाहिजे, हे सगळे लोकांपर्यंत पोहचले पाहिजे, या सगळ्याचा अंतर्भाव असलेले स्मारक गरजेचे ठरेल आणि त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवा, असे आवाहन डॉ. भोसले यांनी केले.

सारंग पाटील म्हणाले, ‘आगरकरांचे विचार आणि कार्य पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचणे, ही आजची गरज असून, आगरकरांच्या विचारांनी प्रेरित पत्रकारिता हीच खरी समाजप्रबोधनाची दिशा आहे.’

पुरस्काराला उत्तर देताना अनिल देसाई म्हणाले, समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा नष्ट करण्यासाठी सुधारककार आगरकरांनी सुरू केलेला लढा हा देशाला प्रेरणादायी ठरला आहे. दुष्काळी भागाला सुजलाम-सुफलाम करणाऱ्या टेंभू योजनेला त्यांचे नाव द्यावे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कार्यक्रमात प्राचार्य डॉ. मोहन राजमाने, रामकृष्ण वेताळ, प्रा. डॉ. विनोद बाबर, हणमंतराव मोहिते, संदीप चेणगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.