आसाराम लोमटे

करोना काळात दळणवळणावर बंधने आल्याने शेतमाल, भाजीपाला, फळे यांचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने उत्पादकांची कोंडी आणि ग्राहकांची गैरसोय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी उत्पादक ते ग्राहक असा प्रयोग अनेक ठिकाणी राबवला गेला असला तरीही कृषी तांत्रिक व्यवस्थापनासाठी जन्माला आलेल्या ‘आत्मा’ या सरकारी यंत्रणेमार्फत राज्यभर सुरुवातीपासूनच गतीने पावले उचलली गेली असती तर शेतकऱ्यांचे नुकसान टळले असते. त्याचबरोबर शहरातील ग्राहकांनाही सहजपणे फळे भाजीपाला यांचा पुरवठा झाला असता.

जागतिक बँकेच्या सहकार्याने केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी ‘आत्मा’ हा विभाग सुरू केला. यावर खर्च होणाऱ्या निधीत ६० टक्के वाटा केंद्र सरकारचा तर ४० टक्के वाटा राज्याचा आहे. शेतकरी गट, शेतकरी सहली, शेतकरी कंपन्यांना चालना देणे, सामूहिक शेती आदी उपक्रमांना थेट शेतकऱ्यांपर्यंत पोचवून शेतीविषयक नवतंत्रज्ञान देणे हे प्रामुख्याने आत्माचे कार्य आहे.

आज तेथे मोठय़ा प्रमाणात अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. बहुतेक पदे ही कंत्राटी भरतीवर असल्याने पूर्ण क्षमतेने ‘आत्मा’चे कामही होताना दिसत नाही. जिल्हास्तरावर ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक हे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी या पदाशी समांतर असल्यासारखेच आहेत त्यामुळे  ‘आत्मा’ची गरजच काय असाही सूर कृषी विभागात उमटू लागला

आहे. ‘आत्मा’च्या माध्यमातून राज्यात १३०० शेतकरी कंपन्यांची नोंदणी झाली आहे. त्यापैकी ४०० कंपन्या प्रत्यक्ष कार्यरत आहेत. राज्यात आज सुमारे सव्वा लाख शेतकरी गट स्थापन झाले आहेत. एवढी यंत्रणा असतानाही या यंत्रणेला योग्य ते मार्गदर्शन, विक्री प्रक्रिया सुलभ होण्यासाठी व्यवस्थापन या बाबी ‘आत्मा’ने केल्या नाहीत.

अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या उत्पादनांची किंमत रसातळाला गेली. बाजारपेठेचे विक्री कौशल्य असणाऱ्या काही शेतकऱ्यांनी आपली उत्पादने थेट घरपोच द्यायला प्रारंभ केला. छोटय़ामोठय़ा शहरांमध्ये हा उपक्रम शेतकऱ्यांनी चालवला. त्याला नव्या तंत्राची जोड मिळाली. शेतकऱ्यांचे ‘व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप’ तयार झाले. त्यावर मागणी नोंदवल्या जाऊ लागल्या. त्यानुसार ग्राहकांपर्यंत पुरवठा होऊ लागला. या कामी शेतकरी ते ग्राहक या प्रक्रियेत शासनाचा कृषी विभाग आणि आत्मा सारखी यंत्रणा यांना प्रभावीपणे काम करता आले असते तर शेतकऱ्यांचा फायदा झाला असता.

करोना काळात शेतकऱ्यांची कोंडी झाली. अशा वेळी उत्पादक शेतकऱ्यांचे केवळ कागदावरच गट तयार करणाऱ्या आणि तांत्रिक व्यवस्थापन शिकवणाऱ्या आत्माने सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला हवे होते. अपवादात्मक परिस्थितीत काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चांगले काम केलेली असेल पण ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी स्वत:च्या बळावर केला आहे. – विलास बाबर, प्रयोगशील शेतकरी