अहिल्यानगर : कृषी सेवा केंद्रांना खत विक्री ई-पॉस यंत्राद्वारे करणे बंधनकारक आहे. मात्र, या यंत्रातच फेरफार करून खताचा काळाबाजार करण्याचा गैरव्यवहार कृषी विभागाच्या भरारी पथकाने उघडकीस आणला. अकोले तालुक्यातील धामणगाव पाट येथे या संदर्भातील कारवाई करण्यात आली. या कारवाईत युरियाच्या ८०४ खतगोण्या जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिली.
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आसिया, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गवसाने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक राहुल ढगे, अकोल्याचे तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी व कृषी अधिकारी रत्नमाला शिंदे यांच्या पथकाने केली.या पथकाने धामणगाव पाट येथील दत्तात्रय गोपीनाथ शेळके यांच्या मे. जय संतोषी माता कृषी सेवा केंद्राची तपासणी केली. तपासणी दरम्यान दत्तात्रय शेळके यांच्या कृषी सेवा केंद्रातील साठा पुस्तक अद्ययावत नसल्याचे आढळले. तसेच खरेदीचे देयके नसून, केवळ चलन असल्याचे आढळले. त्यामुळे पथकाला संशय आला. त्यांनी केंद्राच्या गोदामाची व युरिया खताच्या साठ्याची तपासणी केली. गोदामात खताचा साठा नसल्याचे आढळले.
मात्र, ई-पॉस प्रणालीत युरिया खताच्या ४३ गोण्या शिल्लक असल्याचे दिसून आले. अधिक चौकशी केली असता, ई-पॉस प्रणालीमध्ये फेरबदल करून प्रत्यक्ष विक्री न करता साठा कमी केल्याची आढळले. यातून शासनाची फसवणूक होत असल्याचेही पथकाच्या निदर्शनास आले. त्यामुळे पथकाने केंद्राशेजारीलच घराची पाहणी केली. तेथे ७६१ गोणी युरिया खताचा साठा आढळून आला. हा साठा परवान्यात समाविष्ट नसलेल्या जागेत ठेवण्यात आला होता. खत नियंत्रण आदेश १९८५, अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ व भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध कलमांचा भंग केल्याचे आढळल्याने दत्तात्रय शेळके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे कृषी केंद्रातील अनियमितता व शासनाची फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्याविरोधात कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे. कृषी निविष्ठांमधील गैरप्रकार दिसून आल्यास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयास माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल. सुधाकर बोराळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अहिल्यानगर