रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात होणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाने आता कंबर कसली आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या या निवडणुकांमध्ये काँग्रेस जिल्ह्यात पुन्हा उभारी घेण्यासाठी आपली ताकद पणाला लावणार आहे. यासाठी उत्तर रत्नागिरी जिल्हा काँग्रेसची आढावा बैठक व प्रशिक्षण शिबिर दिनांक ८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता चिपळूण नगर परिषदेजवळ धवल व्यापारी संकुल चिपळूण येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांनी दिली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची असलेली राजकीय ताकद कमी झाली आहे. काँग्रेसची जिल्ह्यात परिस्थिती बिकट असताना वांरवार या पक्षाला उभारी देण्याचे काम राज्यस्थरावरील नेत्यांनी केला होता. मात्र त्याला म्हणावे तसे यश आले नाही. रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला पुन्हा ताकद देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी जिल्ह्यात गाटीभेटी वाढविल्या होत्या. त्यानंतर जिल्ह्याच्या कार्यकारणीत बदल करुन पक्षाची ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला होता. याच पार्श्वभूमीवर मागील महिन्यात काँग्रेसच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी सोनललक्ष्मी घाग यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेस बळकटीकरणाच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये काही दिवसांपूर्वी दापोली येथे दापोली तालुका काँग्रेस कार्यालयाचे उद्घाटन केले.
काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी पुकारलेल्या ‘व्होट चोरी’ विरोधात दिल्ली येथे केलेल्या आंदोलनावेळी झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी चिपळूणमध्ये निषेध आंदोलन छेडण्यात आले होते. तसेच काँग्रेसच्या वाढीसाठी सद्या पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत प्रवाहात सामील करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधील मरगळ झटकण्यासाठी उत्तर रत्नागिरी जिल्हा काँग्रेसची आढावा बैठक व प्रशिक्षण शिबिर सोमवार दिनांक ८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता धवल व्यापारी संकुल चिपळूण नगर परिषदे जवळील- खेंड येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत संघटनात्मक आढावा घेण्याबरोबरच आगामी स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केले जाणार आहे. तरी या बैठकीला काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांनी केले आहे.