अहिल्यानगर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणून डॉ. विक्रम साराभाई स्पेस सेंटर थुंबा, केरळ (इस्रो) या ठिकाणी जाणाऱ्या सहलीसाठी जिल्हास्तरावरील निवड चाचणी परीक्षा रविवारी घेण्यात आली. या परीक्षेसाठी तालुकास्तरावर चाळणी परीक्षा घेण्यात आली होती. त्यातून जिल्हास्तरीय परीक्षेसाठी २१० विद्यार्थी पात्र ठरले होते. या विद्यार्थ्यांनी आज ही परीक्षा दिली. यातून ४२ विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. या सहलीचा खर्च जिल्हा परिषद करणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या मार्गदशाखाली ही परीक्षा झाली. परीक्षेचे नियोजन प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर जाधव यांनी यांनी नगर शहरातील रुपीबाई मोतीलाल बोरा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत केले होते.

या परीक्षेसाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून इयत्ता पाचवी, सहावी, सातवी व आठवी या गटांमध्ये तालुकानिहाय पाच विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय चाळणी परीक्षेसाठी लेखी परीक्षेतून गुणवत्तेवर आधारित निवड करण्यात आली होती. या परीक्षेसाठी जिल्ह्यातून इ. पाचवीचे ३३९३, इ. सहावीचे २४९० तसेच इ. सातवी व आठवीचे २९३६ असे एकूण ८८१९ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. परीक्षेसाठी अभ्यासक्रमातील विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता चाचणी व भाषिक कौशल्य यांचा समावेश करण्यात आला होता. नगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाची आवड निर्माण व्हावी, संशोधन वृत्ती वाढीला लागावी, यासाठी या सहलीचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. जिल्हास्तरीय निवड चाचणीसाठी प्रत्येक तालुक्याचे तालुकास्तर निवड चाचणीतून गुणानुक्रमे प्रथम आलेले पाच विद्यार्थी याप्रमाणे प्रत्येक तालुक्यातील एकूण १५ विद्यार्थी असे जिल्ह्यातील २१० विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते.

परीक्षा केंद्र संचालक म्हणून उपशिक्षणाधिकारी विलास साठे यांनी कामकाज पाहिले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी परीक्षा केंद्रास भेट देऊन स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर घेण्यात आलेल्या या परीक्षेच्या आयोजनाबाबत समाधान व्यक्त केले. या परीक्षेचा अंतिम निकाल शिक्षकदिनी, दि. ५ सप्टेंबरला जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर जाहीर केला जाणार आहे.

या परीक्षेतून प्रत्येक तालुक्यातील इयत्तानिहाय गुणानुक्रमे प्रथम येणाऱ्या ४२ विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहलीसाठी निवड केली जाणार असून, त्यांना विमान प्रवासाद्वारे विश्वेश्वरय्या म्युझियम बंगळुरू (कर्नाटक), डॉ. विक्रम साराभाई स्पेस सेंटर थुंबा (केरळ) येथील क्षेपणास्त्र प्रक्षेपक अंतराळविषयक संग्रहालय तसेच त्रिवेंद्रम येथील तारांगण व प्राणिसंग्रहालय येथे जाण्याची संधी जिल्हा परिषदेमार्फत मिळणार आहे.

पालक प्रतिक्रिया

जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलीचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. पारदर्शकपणे परीक्षेचे नियोजन करून त्याद्वारे स्पर्धा परीक्षेची तयारी केली जाते. विद्यार्थ्यांना या सहलीमुळे वैज्ञानिकांशी संवाद साधण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. -अंजली प्रवीण ढोकणे, उंबरे (राहुरी)

विद्यार्थी प्रतिक्रिया

माझी निवड मागच्या वर्षीही तालुकास्तरावर झाली होती. यावर्षी मी जास्त तयारी केल्यामुळे मला परीक्षा खूप सोपी गेली. माझे शिक्षक, आई-वडील यांनी माझी खूप तयारी करून घेतली. मला विमानाने प्रवास करायला मिळाल्यास मला खूप आनंद होईल. -कर्तव्य अशोक कराळे इ . ६ वी (निंबोडी)

शिक्षक प्रतिक्रिया

जिल्हा परिषदेमार्फत शैक्षणिक सहलीच्या निवड प्रक्रियेसाठी चांगले नियोजन केले आहे. यानिमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षा संदर्भात भीती कमी होऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवीन संधी उपलब्ध होईल. गरीब घरातील विद्यार्थ्यांचा विमान प्रवास पुढील काळामध्ये त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरेल. -राजकुमार यादवराव इथापे, प्राथमिक शिक्षक, हिरडगाव (श्रीगोंदा)