अहिल्यानगर : महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध झाल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदारयादीचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. १ जुलै २०२५ या अर्हता तारखेची शहर विधानसभा मतदारसंघाची यादी गृहीत धरली जाणार असून, त्याचे १७ प्रभागांत विभाजन केले जाणार आहे.मनपा कर्मचाऱ्यांनी मतदारयादीचे विभाजन करताना हद्दीबाहेरील मतदारांचा समावेश होणार नाही, याची दक्षता घ्यावी व यादीची पडताळणी करावी, अशा सूचना आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, ६ नोव्हेंबरला प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्याचे काम महापालिकेकडून सुरू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी आयुक्त डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा सभागृहात बैठक घेण्यात आली.आयुक्त डांगे यांनी सांगितले, की शहर विधानसभेच्या मतदारयादीतून भिंगार व बुरुडगाव येथील मतदार वगळून महापालिका हद्दीची यादी स्वतंत्र करावी. त्याचे १७ प्रभागांनुसार विभाजन करावे. शहराच्या हद्दीबाहेरील मतदारांचा समावेश होणार नाही याची दक्षता घ्यावी. मतदारांची संख्या आणि महापालिकेसाठी तयार केलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादीतील मतदारांची एकूण संख्या समान असणे आवश्यक आहे. त्याची खात्री करावी, असे त्यांनी सांगितले.

तसेच, मतदारयादीतील दुबार नावांबाबत, मयत अथवा स्थलांतरित मतदारांच्या बाबतीत आयोगाच्या आदेशानुसार विशिष्ट चिन्हे करून अशा मतदारांच्या ओळखीचे पुरावे तपासण्यासाठी केंद्राध्यक्षांना कळवण्यात यावे. विधानसभेसाठी तयार करण्यात आलेल्या मतदारयादीमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नाव वगळणे, नावातील दुरुस्ती व पत्त्यामधील दुरुस्ती करणे इत्यादीबाबतची कार्यवाही करण्यात येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महापालिका निवडणूकीच्या पूर्वतयारीला प्रशासकीय पातळीवर वेग आलेला आहे. प्रभाग रचना अंतिम होऊन महापौर पद, प्रभागाचे आरक्षण याची प्रतिक्षा लागलेली आहे. प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर दुसरीकडे राजकीय पक्षांच्या पातळीवरही हालचाली होऊ लागलेल्या आहेत. इच्छुकांनी वैयक्तिक भेटीगाठीतून, दिवाळी सणाची पर्वणी सादर विविध मार्गांनी शुभेच्छा देत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. महायुतीमधील घटक पक्ष तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्ष यांच्या पक्ष पातळीवर उमेदवारी चाचपणीसाठी स्वतंत्र बैठका सुरू झाल्या आहेत. मात्र महायुती असो किंवा मविआ यांच्यामधील जागा वाटपांच्या एकत्रित चर्चांच्या बैठकांना अद्याप मुहूर्त लाभलेला नाही.