संगमनेर: सुनीता भांगरे आणि अमित भांगरे यांनी आपली भेट घेतली हे खरे आहे. या भेटीप्रसंगी माजी आमदार वैभव पिचडदेखील उपस्थित होते. त्यांच्याबाबतचा अंतिम निर्णय होईलच, असे सांगतानाच नगर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी ‘ऑपरेशन लोटस’ निश्चित होईल. अनेक जण आमच्या पक्षात येण्यास इच्छुक आहेत. वेळ येईल तेव्हा सर्व नावे पुढे येतील, असे सूचक वक्तव्य पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी संगमनेरमध्ये बोलताना केले.
महायुतीच्या वतीने आज, शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी ते म्हणाले, की जिल्ह्यातील अनेक जण भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत. पक्षाची क्षमता वाढवू शकणाऱ्या लोकांना बरोबर घेण्याचे धोरण असून, त्या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पक्षाच्या विस्ताराचे काम सुरू आहे. विधानसभा निवडणुकीप्रमाणेच आगामी निवडणुकीमध्येसुद्धा मोठे परिवर्तन होईल.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपमधील नव्या-जुन्या कार्यकर्त्यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना विखे म्हणाले, की गडकरी ज्येष्ठ नेते आहेत. मात्र, त्यांच्या मताशी मी सहमत नाही. त्यांनी कोणत्या संदर्भाने विधान केले, मला माहीत नाही. मात्र नव्या-जुन्या कार्यकर्त्यांचा मेळ घालूनच पक्ष पुढे गेला आहे. सर्वांच्या समन्वयाने राज्यात महायुतीचे सरकार येऊ शकले. पक्षाचा विस्तारसुद्धा सर्वांचा मेळ घालून होत आहे.
सोनईची (ता. नेवासा) घटना मानवतेला काळीमा फासणारी असून, त्या संदर्भात पोलीस उपमहासंचालक आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांशी चर्चा झाली आहे. आरोपी कोणीही असो, कारवाई होणारच. मात्र संघाच्या कार्यकर्त्यांशी संबंध जोडून कोणी स्वतःचा बचाव करीत असेल, तर ते शक्य होणार नाही. पोलीस चौकशी करून दोन-तीन दिवसांत अहवाल सादर करतील, अशीही माहिती त्यांनी दिली.
शत-प्रतिशत महायुती-विखे
संगमनेरच्या जनतेने मागील दिवाळीला आमदार अमोल खताळ यांना विजयी करून महायुतीला मोठी भेट दिली होती. या वेळची भेट म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शत-प्रतिशत महायुतीचा संकल्प करा. आमच्या निवडणुका झाल्या, आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकीत गट-तट बाजूला ठेवून महायुती जो उमेदवार देईल, त्याच्यामागे उभे राहा, असे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी कार्यक्रमात केले.
परिवर्तन विकासासाठी
संगमनेरच्या जनतेने विकासाचा दीप प्रज्वलित करून आपल्याला दिलेली संधी खूप मोठी आहे. त्यांच्या ॠणातून मी कधीही मुक्त होऊ शकणार नाही. लोकांनी केलेले परिवर्तन विकासासाठी आहे. आगामी काळात आपल्याला तालुक्यात विकासाची प्रक्रिया पुढे घेऊन जायची आहे. यासाठी जनतेची साथ द्यावी असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी या वेळी केले.
