अहिल्यानगर : निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यातील १२ नगरपंचायत व नगरपरिषदसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी लोकसंख्येनुसार सदस्य संख्या, आरक्षणासह निश्चित केली आहे. ही सदस्य संख्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
श्रीरामपूर नगरपरिषदेत सर्वाधिक म्हणजे ३४ सदस्य संख्या असेल तर नेवासे नगरपंचायतीमध्ये सर्वांत कमी १७ सदस्य संख्या असणार आहे. जिल्ह्यात श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर, जामखेड, राहाता, शेवगाव, राहुरी, श्रीगोंदे, पाथर्डी, देवळाली प्रवरा व शिर्डी या १२ नगरपरिषद व १ नेवासे नगरपंचायत अशा १२ पालिकांमधून निवडणुका प्रस्तावित आहेत. त्याच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम सुरू आहे. त्यानुसार प्रारूप प्रभाग रचना २२ ते २८ ऑगस्ट दरम्यान हरकतीसह प्रसिद्ध होणार आहेत तर ३ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे.
विभागीय आयुक्तांनी निश्चित केल्यानंतर राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेली सदस्य संख्या पुढीलप्रमाणे: श्रीरामपूर- एकूण संख्या ३४, महिला राखीव १७, अनुसूचित जाती ६, जमाती १, नामाप्र ९ व सर्वसाधारण ८. कोपरगाव- एकूण संख्या ३०, महिला राखीव १५, अनुसूचित जाती ५, जमाती २, नामाप्र ८ व सर्वसाधारण ८. संगमनेर- एकूण संख्या ३०, महिला राखीव १५, अनुसूचित जाती २, जमाती ०, नामाप्र ८, सर्वसाधारण ८. जामखेड- एकूण संख्या २४, महिला राखीव १२, अनुसूचित जाती ३, जमाती १, नामाप्र ६ व सर्वसाधारण ७.
राहाता- एकूण संख्या २०, महिला राखीव १०, अनुसूचित जाती ३, जमाती १, नामाप्र ५ व सर्वसाधारण ४, शेवगाव- एकूण संख्या २४, महिला राखीव १२, अनुसूचित जाती ४, जमाती ०, नामाप्र ६ व सर्वसाधारण ७, राहुरी- एकूण संख्या २४, महिला राखीव १२, अनुसूचित जाती ४, जमाती २, नामाप्र ६ व सर्वसाधारण ६. श्रीगोंदे- एकूण संख्या २२, महिला राखीव ११, अनुसूचित जाती ३, जमाती ०, नामाप्र ६ व सर्वसाधारण ६. पाथर्डी- एकूण संख्या २०, महिला राखीव १०, अनुसूचित जाती २, जमाती ०, नामाप्र ५ व सर्वसाधारण ६. देवळाली प्रवरा- एकूण संख्या २१, महिला राखीव ११, अनुसूचित जाती ३, जमाती १, नामाप्र ६ व सर्वसाधारण ५. शिर्डी- एकूण संख्या २३, महिला राखीव १२, अनुसूचित जाती ५, जमाती १, नामाप्र ६ व सर्वसाधारण ६. नेवासे (नगरपंचायत)- एकूण संख्या १७, महिला राखीव ९, अनुसूचित जाती २, जमाती १, नामाप्र ५ व सर्वसाधारण ५.
जामखेड, शिर्डीचा प्रश्न
जामखेड परिषदेमध्ये अनुसूचित जमातीचे एक पद प्रथमच राखीव झाले आहे. मागील निवडणुकीत हे पद महिला राखीव नसल्याने यंदा महिला राखीव किंवा कसे हे सोडतीद्वारे ठरवले जाणार आहे. महिला राखीव झाल्यास सर्वसाधारण महिलेची एक जागा कमी होऊन ती सहा होईल तर शिर्डी येथे पूर्वी नगरपंचायत होती, तिचे रूपांतर नगरपरिषदेत झाले आहे. तेथे अनुसूचित जमातीचे एक पद राखीव आहे, हे पद महिला राखीव किंवा कसे हे सोडतीद्वारे ठरवले जाईल. महिला राखीव झाल्यास सर्वसाधारण महिलेची जागा एक कमी होऊन ती पाच होईल, असेही राजपत्रात नमूद करण्यात आले आहे.