Radhakrishna Vikhe Patil / अहिल्यानगर : शहरात घडलेल्या घटनेबाबत पोलीस प्रशासनाने योग्य कारवाई केली आहे, मात्र कोणी कायदा हातात घेऊन सामाजिक शांतता बिघडविण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. जिल्हा मोठ्या नैसर्गिक संकटाला सामोरा जात असताना आफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन त्यांनी केले.
शहरातील घटनेबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांशी आपण संपर्क केला असून, त्यांनी संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही काही लोकांनी जाणीवपूर्वक पोलीस प्रशासनास वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे.
परंतु या घटनेचा गैरफायदा घेऊन धार्मिक, सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणे योग्य नाही. कायदा हातात घेऊन सामाजिक शांतता बिघडविण्याचा प्रयत्न कोणी करीत असेल तर पोलीस प्रशासनही शांत बसण्याची भूमिका घेणार नसल्याचे मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
शहराची सामाजिक शांतता टिकवून ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. समाजामध्ये धार्मिक, सामाजिक तेढ निर्माण करणारी वक्तव्य आणि कृती टाळता आली पाहिजे. शांततेला गालबोट लावण्याचा प्रयत्न होत असेल तर पोलिसांची कारवाई होणारच. जिल्हा मोठ्या नैसर्गिक संकटाला सामोरा जात आहे. दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता राखण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले.
चार गुन्हे दाखल
दरम्यान शहर पोलिसांनी सोमवारी दिवसभरात घडलेल्या घटनांसंदर्भात ४ स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. त्यातील तीन गुन्हे कोतवाली पोलीस ठाण्यात तर एक गुन्हा तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या दगडफेक, तोडफोड प्रकरणात सुमारे १५० ते २०० जणांच्या जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील २९ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.
शांतता कोण बिघडवत आहे? – कळमकर
शहरात गेल्या काही महिन्यांत जातीय तणावाचे प्रकार वाढले आहेत. ऐन सणासुदीत शहरातील सामाजिक सलोखा बिघडवला जात आहे. या घटनांच्या मुळाशी जाऊन पोलिसांनी सखोल तपास करावा व दोन्ही बाजूंच्या अपप्रवृत्तींवर, शहराची शांतता बिघडवणाऱ्यांवर कारवाई करावी. या प्रकारांना कोण खतपाणी घालत आहे, याचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी केली आहे.