अहिल्यानगर: महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात अटकेत असलेले शिवसेनेचे (ठाकरे गट) शहरप्रमुख किरण काळे यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. त्यांनी वकील अभिजीत पुप्पाल यांच्यामार्फत जामीन मिळण्यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला. आता त्यावर मंगळवारी (दि. २९) सुनावणी ठेवण्यात आली आहे.
किरण काळे यांना कोतवाली पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. काळे यांच्या पोलीस कोठडीची मुदत काल शुक्रवारी संपली. त्यांना पुन्हा न्यायालयापुढे हजर करण्यात आले. तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक तेजस्वी थोरात यांनी न्यायालयीन कोठडी मिळावी, असा मागणी अर्ज न्यायालयात दाखल केला होता.
त्यानंतर काळे यांनी जामीन मिळावा यासाठी आज जिल्हा न्यायालयात अर्ज केला. जिल्हा न्यायाधीश के. एस. कुलकर्णी यांनी सरकार पक्ष व फिर्यादी यांना म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आता जामीन अर्जाची सुनावणी दि. २९ जुलैला ठेवण्यात आली आहे.