अहिल्यानगर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी राज्य सरकारने गट-गण रचनेचा कार्यक्रम जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आता युद्धपातळीवर पूर्वतयारीला सुरुवात केली आहे. त्यानुसार जिल्हा व तालुकानिहाय समित्या तयार करण्यात आल्या आहेत. या सर्व समित्यांचे अध्यक्षपद जिल्हाधिकाऱ्यांकडे असणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी आज, मंगळवारी जिल्हा व तालुकास्तरावरील समित्यांची स्थापना केली.

जिल्हा व तालुकास्तरावरील समितीचे अध्यक्षपद जिल्हाधिकाऱ्यांकडेच राहणार आहे. जिल्हा समितीमध्ये उपजिल्हाधिकारी (महसूल) तहसीलदार (सामान्य प्रशासन) व संगणकतज्ज्ञ सदस्य असतील तर तालुकास्तरावरील समितीचे अध्यक्षपदही जिल्हाधिकाऱ्यांकडेच राहणार असून, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार (निवडणूक) व संगणकतज्ज्ञ असे सदस्य असतील. जिल्हा समितीमध्ये चौघे तर तालुका समितीत पाचजण सदस्य असतील.

प्रारूप प्रभाग रचना राज्य सरकारच्या आदेशानुसार योग्य ती दक्षता घेऊन तयार करण्याची जबाबदारी समितीवर राहणार आहे. प्रारूप तयार करणे, तहसीलदारांनी तयार केलेला कच्चा आराखडा प्रभाग रचना समिती समोर ठेवणे व ही समिती अधिनियमातील व आदेशातील तरतुदींचे पालन करून आराखडा तपासेल. प्रारूप प्रभाग रचनेचे नकाशे योग्य पद्धतीने तयार केली आहेत की नाही, याचीही तपासणी करेल.

जिल्हा परिषदेचे ७५ गट तर पंचायत समितीचे १५० गट असणार आहेत. त्यानुसार दि. १४ जुलैला जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना जाहीर केली जाईल. दि. १८ ऑगस्टला अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोगाकडे किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे आदेश आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडूनही आता हालचालींना वेग आला आहे. इच्छुक पदाधिकारी प्रभाग रचना कशी असेल, त्याच्या सीमारेषा कशा असतील, कोणती गावे जोडली जातील व वगळली जातील याचे आराखडे बांधत आहेत.