अहिल्यानगर: राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या ऑनलाइन प्रणालीच्या (साथी पोर्टल फेज-२) विरोधात राज्यातील कृषी सेवा केंद्रधारक व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईड्स, सीड्स डीलर्स असोसिएशनने (एमएएफडीए) मंगळवारी (दि. २८) राज्यातील सर्व कृषी सेवा केंद्र एकदिवसीय बंद पाळणार असल्याचे जाहीर केले आहे. या आंदोलनाला अहिल्यानगर जिल्हा खते, बियाणे, कीटकनाशके डीलर्स असोसिएशनने पाठिंबा देत बंदमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हा सचिव संग्राम पवार व अध्यक्ष छबूराव हराळ यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.
जिल्हा संघटनेने या संदर्भात जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी यांनाही निवेदन देऊन ही माहिती दिली आहे. संघटनेच्या निवेदनात म्हटले, की साथी पोर्टल फेज-२ प्रणालीमुळे कृषी सेवा केंद्र चालविणाऱ्या विक्रेत्यांना अत्यंत क्लिष्ट प्रक्रिया, तांत्रिक अडचणी, तसेच व्यवहारात अनावश्यक विलंबाचा सामना करावा लागत आहे. परिणामी शेतकऱ्यांना शेतीसाठी खते, बियाणे, कीटकनाशके आदी वेळेवर मिळण्यात मोठे अडथळे निर्माण होत आहेत.
शेतकऱ्यांच्या शेती नियोजनावर त्याचा थेट परिणाम होत आहे. कृषी उत्पादनावरही त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. प्रणालीतील विलंबामुळे खते-बियाण्यांचा पुरवठा उशिरा होत आहे, हे अन्यायकारक आहे, अशी भूमिका वितरकांच्या संघटनेने घेतली आहे. शासनाने प्रणालीतील त्रुटी दुरुस्त कराव्यात, अशी मागणी केली आहे. आमचा बंद हा शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि प्रणालीतील कार्यक्षमतेसाठी प्रतीकात्मक आंदोलन आहे. शासनाने त्वरित उपाययोजना करावी अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा संग्राम पवार व छबूराव हराळ यांनी दिला आहे.
साथी पोर्टलचे उद्दिष्ट पारदर्शक व्यवहार असले, तरी सध्याच्या प्रणालीमुळे व्यवहारात तांत्रिक गुंतागुंत आणि नेटवर्क समस्येमुळे व्यापाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे शासनाने कृषी सेवा केंद्रधारक व शेतकऱ्यांचा विचार करून सुलभ व कार्यक्षम प्रणाली विकसित करून शेतकरी व्यापारी यांच्या हितासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. साथी पोर्टल फेज-२ ही प्रणालीतील तांत्रिक गुंतागुंतीमुळे व्यापाऱ्यांवर अन्याय होत आहे. शेतकरी वर्गालाही याचा फटका बसत असल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. संघटनेने कृषी विभागाच्या ऑनलाइन प्रणालीच्या विरोधात मंगळवारी राज्यभर बंदची हाक दिली आहे. राज्यभरात गाव पातळीपर्यंत शेकडो कृषी सेवा केंद्र आहेत. ही सर्व केंद्रे लाक्षणिक बंद पाळणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
