राहाता : नगर-मनमाड या राष्ट्रीय महामार्गाच्या झालेल्या दुरवस्थेमुळे नागरिकांचा बळी जात आहेत, अपघातात अपंगत्व आले आहे, याकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शहरातून जाणाऱ्या, महामार्गावरील खड्ड्यात वृक्षारोपण केले. तसेच शहरातील कोपरगाव नाक्याजवळील पावसामुळे साचलेल्या पाण्यात कागदी होड्या सोडण्याचे आंदोलन केले.

या आंदोलनासंदर्भात बोलताना ठाकरे गटाचे राहाता शहराध्यक्ष गणेश सोमवंशी यांनी सांगितले की, नगर-मनमाड महामार्गाची दुरुस्ती अनेक वर्षांत झालेली नाही. महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. दुचाकी चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे अपघातात बळी जात आहेत, अनेकांना अपंगत्व देखील आले आहे. महामार्गाच्या दुरुस्तसाठी अनेकवेळा आंदोलन झाली. मात्र, राज्य सरकारला अपघातात मृत्यू झालेल्या व अपंगत्व आलेल्या नागरिकांचे काही घेणे देणे नाही. महामार्गाच्या दुरवस्थेमुळे जिल्ह्याचे नाव खराब होत असून, सरकारला प्रश्नाबाबत जाग यावी, यासाठी आंदोलन करण्यात आले.

दुरुस्तीचे काम सुरू न केल्यास शिवसैनिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडतील, असा इशारा गणेश सोमवंशी व इतर पदाधिकाऱ्यांनी दिला. तालुकाप्रमुख सोमनाथ गोरे, पदाधिकारी नाना बावके, अमोल गायके, सुनील परदेशी, पुंडलिक बावके, संदीप सोनवणे, दीपक टाक, गोरख वाकचौरे, अमित महाले, महेश पाखरे, सचिन सदाफळ, गंगाधर बेंद्रे, आंबा अरगडे, अमोल खापटे, गरुड गव्हाणे, यश गोऱ्हे आदी सहभागी होते.