अहिल्यानगर: महापालिकेच्या जन्म- मृत्यू विभागात नागरिकांची अडवणूक होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( अजित पवार गट) पदाधिकाऱ्यांनी मनपाच्या जुन्या कार्यालयाला भेट देत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. नागरिकांनी दाखल्यासाठी एजंटचा आधार घ्यावा लागतो, एजंट पैसे उकळत असल्याच्या तक्रारी केल्या. या अधिकाऱ्यांच्या विभागातून बदल्या करण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे. यापुढे तक्रार आल्यास अधिकाऱ्यांना काळे फसण्याचा इशारा राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी दिला.
सध्या शाळा, महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत. अनेक ठिकाणी दाखल्यांची गरज पडते. अशा परिस्थितीत नागरिकांची अडवणूक होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. समक्ष भेटीतही नागरिकांनी तक्रारी केल्या. आयुक्तांनी याची दखल घेऊन मक्तेदारी निर्माण झालेल्या कर्मचाऱ्यांना तिथून हटवावे व प्रक्रिया सुरळीत राबवावी, अशी मागणी उपमहापौर गणेश भोसले यांनी केली.
या संदर्भात माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी सांगितले की, सोमवारी दुपारी जन्म व मृत्यू विभागात जाऊन माहिती घेतली असता नागरिकांनी एजंटमार्फत पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी केल्या. काही नागरिकांचे दाखले एक वर्षापासून प्रलंबित आहेत. अधिकारी, कर्मचारी मनमानी कारभार करत त्रुटी काढत आहेत. अधिकारी, कर्मचारी व एजंटाचे साटेलोटे असल्याशिवाय हे शक्य नाही, असा आरोप करत भागानगरे यांनी आयुक्तांनी अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्यात, अन्यथा राष्ट्रवादी तीव्र आंदोलन करेल, असा इशारा दिला आहे.