अहिल्यानगर: महापालिकेची अंतिम प्रभाग रचना आज, बुधवारी मुदतीनंतर तिसऱ्या दिवशीही प्रसिद्ध झालेली नव्हती. राजकीय हस्तक्षेपामुळे ही प्रभाग रचना अंतिम केव्हा होणार याबद्दल संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. मात्र असे असतानाच राज्य निवडणूक आयोगाने प्रारूप मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम मात्र जाहीर केल्याने या संभ्रमावस्थेत भर पडली आहे. प्रभाग अंतिम झाले नसताना मतदार यादी कशी तयार करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी मनपाची प्रारूप प्रभाग रचना तयार करून, त्यावर हरकती व सुनावणीची प्रक्रिया पार पाडून ती मान्यतेसाठी राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडे धाडण्यात आली आहे. मात्र महायुतीमधील घटक पक्षातील रस्सीखेचिमुळे ही प्रारूप रचना मुदत उलटून गेली तरी अंतिम झालेली नाही. अंतिम प्रभाग रचना ९ ते १३ ऑक्टोबर दरम्यान प्रसिद्ध करावयाची होती.

आज बुधवारी रात्री ८ वापर्यंत ती प्रसिद्ध झालेली नव्हती. त्यासाठी मनपा प्रशासक तथा आयुक्त यशवंत डांगे व उपायुक्त विजयकुमार मुंडे मुंबईतच तळ ठोकून आहेत. प्रशासक डांगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून अंतिम प्रभाग रचना आज प्रसिद्ध होईल का याबद्दल ठोस माहिती मिळू शकली नाही.

दिलेल्या मुदतीत प्रभाग रचना अंतिम करणे बंधनकारक आहे. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने वेळापत्रक ठरवून दिले होते. त्यास कोणतीही मुदतवाढ जाहीर करण्यात आली नाही. मुदत संपून तिसरा दिवस उलटला तरी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध झाली नाही. मध्य शहर व लगतच्या काही प्रभागाच्या रचनेत फेरबदल करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर राजकीय हस्तक्षेप होत असल्याने ही रचना नगरविकास विभागाकडेच प्रलंबित आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून यातील दिरंगाईबद्दल आरोप केले जात आहेत.

प्रभाग रचना अंतिम होण्यापूर्वीच आता प्रारूप मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार ६ नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यावर १४ नोव्हेंबरपर्यंत हरकती नोंदवता येणार आहेत. त्यावरील सुनावणी होऊन २८ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

त्यानंतर ४ डिसेंबरला मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे तर १० डिसेंबरला मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. राज्यातील इतर महापालिकांची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध झाली असली तरी अहिल्यानगर महापालिकेची अंतिम प्रभाग रचना अद्यापि प्रलंबितच आहे.