अहिल्यानगरः एसटी महामंडळाने नेवासा आगाराला नवीन किमान १० एसटी बस उपलब्ध करून द्याव्यात, तसेच बस स्थानकावर प्रवाशांसाठी मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध कराव्यात, अन्यथा नेवासा बसस्थानक बंद आंदोलन करण्याचा इशारा नेवासा तालुका प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अनिल दिनकरराव ताके यांनी दिला आहे. यासंदर्भातील निवेदन त्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, परिवहनमंत्री प्रतापसिंह सरनाईक, आमदार विठ्ठलराव लंघे, जिल्हाधिकारी, एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रकांना पाठवले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नेवासा हे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे रचनास्थान असून, येथे मोठ्या प्रमाणात भाविक आणि प्रवासी ये-जा करतात. मात्र, नादुरुस्त व जुन्या बस, चालक-वाहकांची कमतरता, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, कँटीन यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नेवासा आगारासाठी नवीन किमान १० बस तत्काळ उपलब्ध कराव्यात. सध्या ७८ चालक आणि ७४ वाहक कार्यरत असून, आणखी ७ चालक व ७ वाहकांची नेमणूक करावी. बंद झालेली श्री क्षेत्र देवगड–पंढरपूर बससेवा पुन्हा सुरू करावी. आगारात देखभाल व दुरुस्तीसाठी येणाऱ्या १६ बसमुळे मोठ्या प्रमाणात प्रवासी गर्दी होते, त्यामुळे स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी व अधिकृत कँटीनची व्यवस्था करावी. महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बसस्थानकावर स्वतंत्र रखवालदार नियुक्त करावा. या मागण्यांकडे वेळोवेळी निवेदने देऊनही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे यावेळी नेवासा तालुक्यातील भाविक, प्रवासी आणि स्थानिक जनतेसह दि. १६ जूनला नेवासा बसस्थानक बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा श्री. ताके यांनी दिला आहे.