राहाता: प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून २०२४-२५ मध्ये पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी खरीप हंगामात जिल्ह्यातील २ दोन लाख शेतकऱ्यांना १७४ कोटी आणि रब्बी हंगामाकरिता १७ हजार ५१७ शेतकऱ्यांना १६ कोटी ८५ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.
केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण कवच उपलब्ध करून दिले आहे. २०२४-२५ वर्षात या योजनेमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणीपश्चात नुकसान झालेल्या पिकांना भरपाई देण्याचाही निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार रब्बी हंगाम २०२४-२५ मध्ये जिल्ह्यातील १७ हजार ५१७ शेतकऱ्यांना १६ कोटी ८५ लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाल्याचे विखे यांनी सांगितले. यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती पाहून झालेल्या पंचनाम्यानुसार जिल्ह्यातील ८ हजार ४६७ शेतकऱ्यांना ५ कोटी ६१ लाख आणि काढणीपश्चात नुकसानभरपाई म्हणून ९ हजार ५० शेतकऱ्यांना ११ कोटी २३ लाख रुपयांचे अनुदान वर्ग झाले आहे.
खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणीपश्चात नुकसानभरपाई म्हणून १७४ कोटी ९५ लाख रुपये अनुदान मंजूर झाले आहे. अनुदान मिळालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या २ लाखांहून अधिक असल्याचे विखे यांनी सांगितले.
यापूर्वी किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ५ लाख ४९ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात १०९ कोटी रुपये वर्ग झाले आहेत. या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळत आहे. केंद्र सरकारने सुरू केलेल्या किसान सन्मान योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे. शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली ही एक ऐतिहासिक योजना ठरली असून, वर्षाला ६ हजार रुपये थेट बँक खात्यात वर्ग होत असल्याने या योजनेचा शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.
जिल्ह्यातील ५ लाख ४९ हजार ५१९ शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी २ हजार रुपयांप्रमाणे १०९ कोटी ९० लाख रुपये जमा झाले आहेत. सद्य:स्थितीत अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ही योजना दिलासा देणारी ठरते. यापूर्वी १९ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या अनेक योजनांपैकी किसान सन्मान योजना ही महत्त्वपूर्ण ठरली आहे. योजनांच्या अंमलबजावणीमध्ये केंद्र सरकारकडून सातत्य राखले जात असल्याकडे मंत्री विखे यांनी लक्ष वेधले.