राहाता : शासनाच्या गृहविभागाच्या निर्णयानुसार शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोहेगाव बुद्रूक, पोहेगाव खुर्द व जवळके ही ३ गावे कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यास जोडली आहेत. मात्र अद्यापही कोपरगावातील ९ गावे कोपरगाव पोलीस ठाण्याला जोडण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे या गावांसाठी पोलीस ठाणे म्हणजे असून अडचण, नसून खोळंबा झाले आहे.

राहाता व शिर्डी या दोन पोलीस ठाण्यात विभागलेली गावे कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात समाविष्ट होणे गरजेचे असताना घडले मात्र उलटेच. १३ पैकी केवळ पोहेगाव खुर्द आणि बुद्रूक (दोन्ही मिळून एकच ग्रामपंचायत) आणि जवळके ही दोनच गावे भौगोलिक संलग्नता नसताना कोपरगाव तालुका ठाण्यात वर्ग केली. जवळके गावापासून शिर्डी पोलीस ठाणे केवळ १० ते ११ किमी. अंतरावर आहे आणि कोपरगाव तालुका पोलीस ठाणे २० ते २२ किमी. आहे. या दोन्ही गावांत तत्काळ पोलीस मदत किमान दीड ते दोन तास पोहोचू शकणार नसतानाही तीन गावे जोडली गेल्याची संतप्त प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते नानासाहेब जवरे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.

राहाता तालुक्यातील शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेली कोपरगाव तालुक्यातील ११ ग्रामपंचायत हद्दीतील १३ गावे अद्यापि तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत विभागलेली आहेत. यातील ३ गावे कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याशी जोडण्याचा निर्णय राज्याच्या गृहविभागाने नुकताच काढल्याने उर्वरित ९ गावे कोपरगाव पोलीस ठाण्याला जोडण्याच्या प्रतीक्षेत आहेत. प्रशासकीयदृष्ट्या ती एकाच तालुक्यात हवी होती. त्यासाठी जनमंगल ग्रामविकास संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सन २००० मध्ये १३ गावच्या ग्रामसभांचे ठराव घेऊन ही सर्व गावे भौगोलिक संलग्नतेसाठी राहाता तालुक्याला जोडावी अशी मागणी केल्याचेही जवरे यांनी सांगितले.

आपल्या माहितीप्रमाणे ७ ते ८ वर्षापूर्वी या गावांनी ग्रामसभेचे ठराव घेऊन कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात समावेश करावा अशी मागणी केली होती. त्यानुसार शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोहेगाव बुद्रूक, पोहेगाव खुर्द व जवळके ही ३ गावे कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यास जोडण्याचा निर्णय राज्य शासनाच्या गृहविभागाने घेतला आहे. – सोमनाथ वाघचौरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर

कोपरगाव तालुक्यातील वेस-सोयगाव ग्रामपंचायत एकच असताना वेस गाव शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तर सोयगाव राहाता पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे मोठे आक्रित आहे तर काकडी, मनेगाव आणि अर्धे सोयगाव ही तीन गावे राहाता पोलीस ठाण्याच्या हद्दीत टाकून पोलीस प्रशासनाने गलथानपणाचा नमुना दाखवला आहे तर राजकीय नेते त्याकडे डोळेझाक करत आहेत. कोपरगाव तालुक्यातील सर्व गावे प्रशासनाने एकाच छताखाली आणणे गरजेचे आहे. – नानासाहेब जवरे, ज्येष्ठ कार्यकर्ते, शेतकरी संघटना, जवळके

कोपरगाव तालुक्यातील नैऋत्येकडील सर्व १३ गावे प्रशासनाच्या व नागरिकांच्या सोयीसाठी एकाच तालुक्यात आणावीत. त्यात नागरिकांचे हित आहे. सन २००० सालानंतर विस्कटलेली घडी पूर्ववत करावी. – गंगाधर रहाणे, कोपरगाव तालुका शिवसेना अध्यक्ष (ठाकरे गट)