अहिल्यानगर : शहर व परिसरासह जिल्ह्याच्या अनेक भागांत आज, रविवारी तिसऱ्या दिवशीही संततधार सुरूच होती. श्रीगोंद्यातील ९ महसूल मंडलांसह अहिल्यानगर तालुक्यातील एक व कर्जतमधील दोन अशा १२ मंडलांमध्ये ६५ मिमी. पेक्षा अधिक पाऊस म्हणजे अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे भाजीपाल्यासह केळी, डाळिंब आदी फळबागांचे नुकसान होत आहे.
काल झालेल्या पावसाने सहा घरांची पडझड झाली तर एक गाय जखमी झाली. शहर व परिसरास गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. कमीअधिक स्वरूपात पावसाच्या सरी बरसत आहेत. जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिवसभर अंधारून आल्याने चालकांना वाहनांचे दिवे लावून वाहतूक करावी लागत आहे. शहरभर शहरातील रस्त्यांवर कालवे तयार झाले आहेत. अनेक भागांत रस्त्यांची कामे सुरू असल्याने रस्ते चिखलमय होऊन निसरडे बनले आहेत.
जिल्ह्यात आज सकाळी नोंदवलेल्या चोवीस तासांत श्रीगोंद्यातील ९ मंडलात अतिवृष्टी झाली आहे. त्यामध्ये श्रीगोंदा ८७ मिमी., काष्टी ७२.३, मांडवगण ९७.५, बेलवंडी १३९, पारगाव ७८.५, कोळगाव ११०.३, लोणी व्यंकनाथ ९७, भानगाव ७२.८, आढळगाव ७२.८ मिमी. यांचा समावेश आहे. याशिवाय नगर तालुक्यातील रुईछत्तीसी ९२.३ व कर्जतमधील कुंभळी मंडलात ८०.३ व भांबोरात ७८ मिमी पाऊस झाला आहे.
तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे (आकडे मिमीमध्ये) : अहिल्यानगर ३९, पारनेर २५, श्रीगोंदा ८७, कर्जत ५३, जामखेड २३.४, शेवगाव १२.९, पाथर्डी ३४.८, नेवासा १३.२, राहुरी ११.१, संगमनेर ४.१, अकोले २.३, कोपरगाव ४.२, श्रीरामपूर ३ व राहता ६.३. जिल्ह्याच्या उत्तर भागापेक्षा दक्षिण भागात पावसाचे प्रमाण अधिक आहे. अनेक ओढेनाले दुथडी भरून वाहत आहेत. शेतातही पाणी साचले आहे.