अहिल्यानगर : शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्वर देवस्थानच्या दैनंदिन कामकाजासाठी देवस्थानचे प्रशासक तथा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी ११ जणांची कार्यकारी समिती नियुक्त केली आहे. त्यानुसार देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे यांची नियुक्ती केली आहे. श्री. चोरमारे यांनी आज, बुधवारी शनिशिंगणापूरला भेट देत प्राथमिक माहिती घेतली.
जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेली कार्यकारी समिती पुढीलप्रमाणे
उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे मुख्य कार्यकारी अधिकारी, नेवासा तहसीलदार संजय बिरादार उपमुख्य कार्यकारी अधिकारी, नेवासा गटविकास अधिकारी संजय लखवाल सदस्य, शनी शिंगणापूरचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष शेळके सदस्य, सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता विनायक पाटील सदस्य, जिल्हाधिकारी कार्यालयातील लेखाधिकारी गणेश खेडकर मुख्य लेखा अधिकारी तथा सदस्य, नेवासाचे उपकोषागार अधिकारी राजकुमार पुंड उपमुख्य लेखाधिकारी तथा सदस्य, नायब तहसीलदार राजेंद्र वाकचौरे व्यवस्थापक तथा सचिव, घोडेगावचे मंडलाधिकारी विनायक गोरे उपव्यवस्थापक तथा सदस्य, शनिशिंगणापूरचे तलाठी सतीश पवार सदस्य, शनिशिंगणापूरचे ग्रामसेवक दादासाहेब बोरुडे सदस्य.
या समितीने श्री शनैश्वर देवस्थान विश्वस्त व्यवस्थेचे प्रशासन, दैनंदिन कामकाज, व्यवहार, वित्तीय बाबी, संपत्तीचे संरक्षण तसेच भक्तांसाठीच्या सर्व सेवा सुविधांचे व्यवस्थापन जबाबदारीने पार पाडून वेळोवेळी प्रशासकांना अहवाल सादर करायचा आहे. या कार्यकारी समितीमध्ये सर्वच सरकारी अधिकारी आहेत. एकही अशासकीय सदस्य नाही.
राज्य सरकारने गेल्या महिन्यात देवस्थानच्या विश्वस्त मंडळावर गैरव्यवहार व चुकीच्या कामकाजाचा ठपका ठेवत हे मंडळ बरखास्त केले व तेथे प्रशासक म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती केली. तत्पूर्वी विधिमंडळाच्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वस्त मंडळाच्या गैरव्यवहाराची जाहीर वाच्यता केली होती.
विश्वस्त मंडळाच्या कारभाराची धर्मदाय आयुक्त मार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे. देवस्थानवर पूर्वी धर्मदाय आयुक्तांमार्फत विश्वस्त मंडळ नियुक्त केले जात होते. मात्र, सन २०१८ मध्ये भाजप सरकारने तयार केलेल्या देवस्थान कायद्याची अंमलबजावणी आता सन २०२५ मध्ये सुरू करण्यात आल्याने नवीन कायद्यानुसार विश्वस्त मंडळ अस्तित्वात येणार आहे. त्यामुळे देवस्थानवर आता राज्य सरकारचे नियंत्रण असणार आहे. नवीन विश्वस्त मंडळावरील नियुक्तीसाठी आत्तापासूनच महायुतीमधील घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांत हालचाली सुरू झाल्या आहेत. शिर्डीतील साईबाबा देवस्थानच्या धर्तीवर हे विश्वस्त मंडळ असेल. मात्र, शिर्डीतील साईबाबा देवस्थानवरील विश्वस्त मंडळावरील राजकीय वर्णी वेळोवेळी वादाच्या भोवऱ्यात सापडली. त्यामुळे आता तेथे उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखालील समितीमार्फत कारभार सुरू आहे.