अहिल्यानगरः भारतीय हवामान खात्याने अहिल्यानगर जिल्ह्यात उद्या, सोमवारी (दि. ३१), मंगळवारी (दि. १) व बुधवारी (दि. २) विजांच्या कडकडाटासह वादळीवारे तसेच हलक्या व मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ‘तरी ॲलर्ट’ प्रसारित केला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील नागरिकांना दक्षता बाळगण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी केले आहे.

नागरिकांनी मेघगर्जनेच्या वेळी, विजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहताना झाडाखाली किंवा झाडाजवळ उभे राहू नये. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. गडगडाटीच्या वादळादरम्यान व विजा चमकत असताना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर, शेतीची अवजारे, मोटरसायकल, सायकल यांच्यापासून दूर राहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत दिव्यांचे खांब, धातूचे कुंपन, विद्युत वाहिनी अथवा रोहित्राजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणा-या, लोंबणा-या केबल्स् पासून दूर रहावे.

तसाच जाहिरात फलक (होर्डिंग्ज्) कोसळून होणा-या दूर्घटना टाळण्यासाठी दक्षतेची बाब म्हणून जाहिरात फलकांच्या (होर्डिंग्ज्) आजूबाजूला थांबू नये व योग्य ती दक्षता घ्यावी. वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे. जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा. गारपीटी दरम्यान मोकळ्या जागेवर आल्यास बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.

धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणा-या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. धरणाच्या पाण्यात वा नदीच्या पाण्याच्या प्रवाहात उतरू नये. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. वादळीवारा, पाऊस व गारपीटीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकर्यांनी वेळीच नियोजन करावे. शेतक-यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे व जनावरांचे संरक्षण होईल याची दक्षता घ्यावी. प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे. आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.