अहिल्यानगर : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील अकुशल कुटुंबांना सामाजिक सुरक्षिततेसाठी रोजगार हमी योजना राबवली जाते. मात्र या योजनेत काम करणाऱ्यांच्या मजुरीचे कोट्यवधी रुपये थकले आहेत. कुशल कामाची मजुरी गेल्या मार्च २०२५ पासून मिळालेली नाही तर कुशल कामाची मजुरी तर दीड वर्षापासून मिळालेली नाही. जिल्ह्यात अकुशल कामांच्या मजुरीचे ३ कोटी ५४ लाख रुपये थकले आहेत तर राज्यभरात अकुशल कामाचे १७९ कोटी ८४ लाख रुपये थकले आहेत.
हे पैसे केव्हा मिळणार याची विचारणा करण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेमध्ये मजूर हेलपाटे मारतात. मात्र त्यांना निराशाजनक उत्तर मिळते. मजुरीची रक्कम थेट बँक खात्यात जमा होते.
गेल्या वर्ष -दोन वर्षांपासून रोहयो मजुरीचे पैसे मिळण्यात अडचणी जाणवत आहेत. काम करणाऱ्या विविध सरकारी यंत्रणा व जिल्हा परिषद पाठपुरावा करते. कधीतरी टप्प्याटप्प्याने पैसे उपलब्ध होतात, मात्र पुन्हा थकले जातात. ग्रामपंचायतीमार्फत होणारी कामे जिल्ह्यात अधिक आहेत, त्यावर मजूरही अधिक संख्येने उपलब्ध आहेत. त्या तुलनेत विविध सरकारी यंत्रणांची क्षमता असूनही त्यांच्याकडे मोजकीच कामे सुरू आहेत व मजुरांची संख्याही अत्यंत कमी आहे.
गेल्या जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात रोहयोवरील मजुरांची संख्या तब्बल ३८ हजारांवर पोहोचली होती. पाऊस सुरू झाल्यानंतर, शेतातील कामे सुरू झाल्यानंतर आता ती आता घटली आहे. तरीही जिल्ह्यातील २६३० कामांवर १३ हजारांवर मजुरांची उपस्थिती गेल्या आठवड्यात होती. जिल्ह्यातील ६४२ ग्रामपंचायतीमार्फत तर रोहयोची काम सुरू आहेत. रोहयोमार्फत वैयक्तिक व सार्वजनिक अशी दोन्ही स्वरूपाची कामे होतात.
वैयक्तिक स्वरूपाच्या कामांमध्ये विहीर खोदकाम, फळबाग लागवड, शौचालय व शोषखड्डे निर्माण करणे, वृक्ष लागवड तर सार्वजनिक कामांमध्ये रस्ते, शाळांचे कुंपण, रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड अशी कामे केली जातात. कुशल व अकुशल अशा दोन्ही स्वरूपाची कामे रोहयोमार्फत होतात. कुशल स्वरूपाच्या वैयक्तिक कामाची मजुरी डिसेंबर २०२३ पासून थकलेली आहे तर वैयक्तिक कामाची मजुरी ऑगस्ट २०२४ पासून थकलेली आहे. अकुशल कामाच्या मजुरीचे पैसे मार्च २०२५ पासून थकलेले आहेत.