धवल कुलकर्णी

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थातच एआयएमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी केलेल्या चिथावणीखोर भाषणाचा वाद सुरू असतानाच, त्यांच्याविरोधात त्यांच्याच पक्षातून विरोधी आवाज तीव्र होऊ लागला आहे. एमआयएमचे आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी वारिस पठाण यांच्या वक्तव्याचा निषेध करताना देशाला असल्या चिथावणीखोर भाषणांची गरज नसून प्रेम आणि बंधुभाव वाढेल अशा कृतीची गरज आहे,’ अशा शब्दात सुनावलं आहे.

महाराष्ट्राच्या विधानसभेत सध्या एमआयएमचे दोन आमदार आहेत

मुफ्ती मोहम्मद इस्माईल हे मालेगावमधून निवडून आले आहेत. महत्त्वाची गोष्ट अशी की, २००७ मध्ये जेव्हा मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या, त्यावेळी मुफ्ती यांनी तिसरा महाज म्हणजेच तिसऱ्या आघाडीची स्थापना करून स्थानिक पातळीवर प्रस्थापित असलेल्या काँग्रेस आणि जनता दल सेक्युलरला धक्का दिला होता.

विकास आणि बंधुभावाच्या मुद्यावर निवडणुका लढवत मुफ्तींनी नुसत्या मुस्लिमच नाही, तर स्थानिक हिंदूंना सोबत घेऊन मालेगावचे मैदान मारले होते. एकेकाळी धार्मिक दंगलीसाठी प्रसिद्ध असलेल्या मुस्लीम बहुल मालेगावमध्ये ही एका वेगळ्या राजकारणाची नांदी होती. २००९ मध्ये ते मालेगावमधून माजी मंत्री विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षातर्फे आमदार म्हणून निवडून आले. सध्या त्यांची आमदार म्हणून दुसरी टर्म सुरू आहे.

“वारिस पठाण यांचे विधान अत्यंत चुकीचे असून, ते देश आणि देशवासियांच्या हिताचे नाही. आज देशाला गरज आहे ती विकासाची. आज परिस्थिती अशी आहे की, लोकांना दोन वेळचं अन्न मिळत नाही आणि घर चालवणे सुद्धा मुश्किल झाले आहे. त्यामुळे अशी विधान करून शांततेचा भंग करू नये आणि कट्टरतावाद वाढीला लागेल असं काहीही करू नये. आपण सध्या ज्या परिस्थितीतून जात आहोत, त्या परिस्थितीत अशी चिथावणीखोर भाषणं आमची गरज नाही तर प्रेम आणि बंधुभाव वाढवण्याची गरज आहे,” असे मुफ्ती यांनी ‘लोकसत्ता डॉट कॉम’शी बोलताना सांगितलं.

मुक्ती म्हणाले की, “मागील वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला स्थानिक हिंदू समाजाने सुद्धा भक्कम पाठबळ दिले कारण त्यांना माझे इथले काम माहित होते. मला स्थानिक हिंदुंनी सांगितले की, आम्हाला तुमच्या पक्षाशी घेणंदेणं नाही. आम्ही तुम्हाला मत देऊ ते व्यक्ती म्हणूनच. याचा परिणाम असा झाला की, मी तब्बल चाळीस हजार मतांची आघाडी घेऊन निवडून आलो. वारिस पठाण यांनी केलेल्या चिथावणीखोर विधानांची नोंद आमच्या पक्षानं घेतली असून त्यांच्यावर जाहीरपणे बोलण्याबाबत मर्यादा टाकण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर पक्ष योग्य ती कारवाई करेल असे मुफ्ती यांनी सांगितले.