विषारी वायू सोडण्याच्या प्रमाणात वाढ; कारखान्यांत वायुगळतीच्या घटना

देशात प्रदूषणात वरचे स्थान पटकावल्यानंतर तारापूर औद्योगिक क्षेत्रात वायु प्रदूषणाने कळस गाठला आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्रात रासायनिक कारखान्यातून घातक रासायनिक सांडपाणी सोडले जात असल्याने जलप्रदूषण मोठय़ा प्रमाणात झाले आहे. त्यात आता हवा प्रदूषणाची भर पडली आहे.

रासायनिक कारखान्यांमधून रात्रीच्या वेळी वेगवेगळ्या प्रकारचे विषारी वायू सोडले जात असल्याच्या तक्रारी येथील नागरिकांनी केल्या आहेत. वायूला उग्र दरुगधी असते. श्वास घेण्यास त्रास होतो. हा त्रास सात किलोमीटर अंतरावरील गावांना जाणवतो, असे नागरिकांनी तक्रारीत म्हटले आहे. कारखान्यांतून सोडल्या जाणाऱ्या वायूचा त्रास जाणवत असल्याने आजूबाजूच्या नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

रासायनिक कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होत आहे. मात्र रोजगारासाठी कामागारांना विषारी वायू सोडलेल्या वातावरणात श्वास घ्यावा लागत आहे.

विषारी वायू सोडण्याबाबत कोणत्याही प्रकारचे निर्बंध नाहीत. त्याचा त्रास आजुबाजुच्या गावातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. काहींना श्वसनाचे आजार जडले आहेत. कारखान्यात हवा प्रदूषण नियंत्रणासाठी असलेल्या यंत्रणेद्वारे  सिटिक वायु तसेच वायूंमधील विषारी पदार्थ बाजूला काढून हवेत सोडला जातो. त्यासाठी कॉस्टिक सोल्यूशन, वॉटक सोल्यूशन स्क्रब सिस्टमचा वापर करणे बंधनकारक असते परंतु ही सर्व प्रक्रिया खर्चिक असल्याने अनेक कारखादार त्याचा वापर करीत नाहीत. काही कारखान्यांत परवानगी नसलेल्या घातक रसायने तयार केली जात असल्याचे आजवर झालेल्या अपघातातून स्पष्ट झाले. अशा प्रक्रियांमधून निघणारा विषारी वायू  आरोग्यासाठी धोकादायक असतो.

औद्योगिक क्षेत्रात वायुगळतीच्या घटना सुरूच

तारापुर औद्योगिक क्षेत्रात कारखान्यात प्रत्येक आठवडय़ात लहानसहान वायुगळतीच्या घटना घडत असल्याने कामगार व नागारिकांन मध्ये भितीचे वातावरण आहे. सोमवारी सायंकाळी औद्योगिक क्षेत्रातील एन झोन मधिल में. महाराष्ट्र ऑर्गेनो मेटालिक कॉटलिस्ट प्रा. लि. कंपनीतील रियाक्टरचा पाईप फुटल्याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी कामगार व परिसरातील नागारिकांना डोळ्यांना जळजळ व डोके दुखीचा ञास जाणवू लागल्याची तक्रार कामगार व नागारिकांनी केली आहे. तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारम्य़ांनी घटना स्थळाची पाहणी केली असून, रियाक्टरचा पाईप फुटल्याची माहिती दिली आहे.